उद्या संध्याकाळी आठ वाजल्यापासून राज्यात संचारबंदी:- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पहा काय चालू राहणार; काय बंद राहणार.
Bhairav Diwase. April 13, 2021
मुंबई:- महाराष्ट्रात गेल्या महिन्याभरात सातत्याने वाढत असलेल्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लॉकडाऊन लागू होणार की कठोर निर्बंध? या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांत मोठी चर्चा पाहायला मिळाली. महाराष्ट्रात रुग्णसंख्येसोबतच मृतांचा आकडा देखील वाढू लागला आह. त्यासोबतच राज्यात ऑक्सिजन, व्हेंटिलेटर या आरोग्य सुविधांची कमतरता देखील जाणवू लागल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन करायला हवा, असा देखील दावा केला गेला. लॉकडाऊन बाबत सर्वच स्तरातून संमिश्र प्रतिक्रिया आल्या. यामध्ये काहींनी लॉकडाऊनचं समर्थन केलं तर काहींनी विरोध केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात सर्वपक्षीय नेते, डॉक्टर, मनोरंजन क्षेत्रातील प्रतिनिधी, तज्ज्ञांशी चर्चा देखील केली. या सर्व चर्चांनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज राज्यातल्या जनतेशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधला.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले...

नाईलाजाने आपल्याला काही निर्बंध घालावे लागणार आहेत. चर्चेत आपण बराच वेळ घालवला आहे. आता निर्णय घेण्याचा क्षण आला आहे. आपल्याला रोजीरोटी महत्त्वाची आहेच. पण त्याआधी जीव वाचवणं आवश्यक आहे. सध्या तोच आपल्यासमोरचा महत्त्वाचा मुद्दा आहे. उद्या संध्याकाळी ८ वाजल्यापासून हे निर्बंध लागू होतील. पंढरपूर मंगळवेढ्याचं मतदान आहे. ते झाल्यानंतर तिथे देखील निर्बंध लागू होतील. उद्या संध्याकाळपासून आपण ब्रेक द चेनं लागू करत आहोत. राज्यात १४४ कलम लागू होणार. याचा अर्थ पुढचे किमान १५ दिवस राज्यात संचारबंदी लागू असेल. अनावश्यक प्रवास पूर्णपणे बंद करावा लागेल. योग्य कारण नसेल, तर घराबाहेर पडायचं नाहीये.

अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व सेवा बंद राहतील. सकाळी ७ ते रात्री ८ या काळात अत्यावश्यक सेवाच चालू राहतील. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आपण बंद करत नाही आहोत. लोकल, बस सुरू राहतील. पण त्या अत्यावश्यक, जीवनावश्यक सेवा देणाऱ्या वर्गाला येण्या-जाण्यासाठी त्या चालू राहतील.

पावसाळ्याची कामं पावसाळ्यापूर्वच करावी लागतात. ती कामं चालू राहतील. बँका सुरू राहतील. दूरसंचार सेवा आणि त्यांच्याशी संबंधित देखभाल सेवा सुरू राहतील. अधिसूचनाधारक पत्रकारांना मुभा देण्यात आली आहे. पेट्रोल सेवांना मुभा देण्यात आली आहे.

बांधकाम साईट्सवर मजुरांची राहण्याची सोय करावी अशी बांधकाम व्यावसायिकांना विनंती आहे. तुमच्या कॅम्पसमध्ये कर्मचाऱ्यांची वसाहत असेल आणि तिथल्या तिथे वाहतूक होत असेल, तर त्याला परवानगी असेल.

हॉटेल, रेस्टॉरंट यांच्यामधून होम डिलीव्हरी आणि टेक अवे यालाच परवानगी असेल. तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं लसीकरण बंधनकारक असेल.

राज्य सरकार म्हणून अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत ७ कोटी लाभार्थ्यांना पुढचा महिनाभर प्रतिव्यक्ती ३ किलो गहू आणि २ किलो तांदूळ मोफत दिले जातील. शिवभोजन थाळी १० रुपयांत सुरू केली होती. कोविड आल्यानंतर ती ५ रुपये केली. आत्तापर्यंत काही कोटी लोकांनी या थाळीचा लाभ घेतला आहे. आता शिवभोजन थाळी पुढचा एक महिना मोफत दिली जाईल. दिवसाला आपण २ लाख थाळ्या देत आहोत. गोरगरीबांसाठी हे शिवभोजन आपण मोफत देणार आहोत. लॉकडाऊननंतर रोजीरोटीचं काय, अशी विचारणा केली जाते. रोजीचं नुकसान होईल, पण रोटीची सोय आपण केली आहे.

महाराष्ट्र इमारत कामगार कल्याणकारी मंडळात राज्यातल्या नोंदणीकृत बांधकाम कामगारांना प्रत्येकी १५०० रुपये अर्थसहाय्य देत आहोत. यांची संख्या १२ लाखांपर्यंत आहे. नोंदणीकृत घरेलू कामगारांना निधी देत आहोत. अधिकृत फेरीवाल्यांना एका वेळचे प्रत्येकी १५०० रुपये आपण देणार आहोत. स्वनिधी योजनेत फेरीवाल्यांची बँकांमध्ये खाती असल्यामुळे थेट खात्यांमध्ये पैसे जमा होतील. त्यांची संख्या ५ लाख आहे. १२ लाख परवानाधारक शेतकऱ्यांना १५०० रुपये एकवेळचे आपण देत आहोत. आदिवासी बांधवांना खावटी सहाय्य योजनेतून एका वेळचे २ हजार रुपये देत आहोत.

जिल्हा स्तरावर आरोग्य सुविधा उभी करण्यासाठी ३ हजार ३०० कोटी फक्त कोविडसाठी बाजूला काढून ठेवतो आहोत. जिल्हाधिकाऱ्यांना थेट स्थानिक पातळीवर निर्णय घेता यावा, यासाठी हे करण्यात आलं आहे. साधारणपणे एकूण ४०० कोटींच्या या योजना आपण या माध्यमातून करत आहोत.

हे सगळं मी प्रामाणिकपणे तुमच्यासमोर ठेवलं आहे. कुठेही लपवाछपवी नाही. नाईलाजाने ही बंधनं टाकावी लागत आहेत. आरोग्यसुविधा तयार करण्यासाठी आणि साखळी तोडण्यासाठी ही बंधनं आपल्याला स्वीकारावी लागत आहेत. ही बंधनं मी एकतर्फी टाकलेली नाहीत. त्यामाग फक्त प्राण वाचावेत हाच हेतू आहे. हे अजिबात आनंददायी नाही. टीका करणारे कितीही असले, तरी त्याला न भुलता आपली जी बांधिलकी आहे, त्याला स्मरून हे निर्बंध तुमच्यावर लादत आहे. त्याचा न रागावता स्वीकार करा आणि कोविडला पराभूत करण्यासाठी कंबर कसून सहकार्य करा.

गेल्या वर्षीही आपण पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या होत्या. तेव्हा म्हणालो होतो की पुढचा गुढी पाडवा कोविडमुक्त असू दे. मधल्या काळात तशी परिस्थिती आपण नक्कीच निर्माण केली होती. फेब्रुवारीपर्यंत आपण कोविडवर नियंत्रण मिळवलं होतं. जिंकत आलेल्या युद्धाला पुन्हा सुरुवात झाली आहे. भयानक पद्धतीने रुग्णवाढ झाली आहे. आजचा आकडा आजपर्यंतचा सर्वात जास्त आहे. ६० हजार २१२ रुग्ण राज्यात सापडले आहेत. ही भितीदायक परिस्थिती आहे.

प्रत्येक गोष्टीची क्षमता असते. त्यापेक्षा जास्त भार त्यावर पडला, तर ती यंत्रणा कोलमडून पडते. आज आपल्या चाचण्यांच्या यंत्रणेवर ताण येतोय. राज्यातल्या आरोग्य सुविधांवर भार यायला लागलाय. विद्यार्थ्यांच्या परीक्षा आपण पुढे ढकलल्या आहेत. पण आपली सुरू असलेली परीक्षा आपण पुढे ढकलू शकत नाही. प्रत्येक गोष्टीची क्षमता असते. त्यापेक्षा जास्त भार त्यावर पडला, तर ती यंत्रणा कोलमडून पडते. आज आपल्या चाचण्यांच्या यंत्रणेवर ताण येतोय. राज्यातल्या आरोग्य सुविधांवर भार यायला लागलाय. विद्यार्थ्यांच्या परीक्षा आपण पुढे ढकलल्या आहेत. पण आपली सुरू असलेली परीक्षा आपण पुढे ढकलू शकत नाही.

आता नुसती चर्चा परवडणारी नाही, नाहीतर...

आपल्याला आता चर्चा परवडणारी नाही. कारण हा कालावधी आपल्या हातातून गेला, तर आपल्याला कुणी वाचवू शकणार नाही. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्सची कमतरता जाणवू लागली आहे. बेड्स मिळत नाहीयेत. रेमडेसिवीरची मागणी प्रचंड वाढली आहे. काही कारखान्यांना विनंती केल्याप्रमाणे त्यांनी आपल्याला ऑक्सिजनचा पुरवठा देखील करायला सुरुवात केली आहे. पण इतर कंपन्यांकडून ऑक्सिजन आपल्या राज्यात आणणं कठीण आहे.

राज्यातली ही परिस्थिती मी पंतप्रधानांना देखील सांगितली आहे. त्यांच्याकडे रोजच्या रोज अहवाल जातो आहे. आपण पारदर्शीपणे सगळ्या गोष्टींना धाडसाने तोंड देत आहोत. काहीही लपवत नाही आहोत.

उद्योगधंद्यांना आधार देण्यासाठी जीएसटीच्या परताव्याला ३ महिन्यांची तरी मुदतवाढ द्यावी, अशी विनंती मी पंतप्रधानांना करणार आहे. त्याशिवाय, भूकंप, पूर या नैसर्गिक आपत्ती जाहीर होतात. करोना या नैसर्गिक आपत्तीप्रमाणेच इतर आपत्तींप्रमाणेच निकष लावून ज्यांच्या रोजीरोटीवर संकट आलंय त्यांना वैयक्तिक मदत द्यावी, अशी विनंती मी पंतप्रधानांना करतोय.

ब्रिटनने अडीच ते तीन महिने लॉकडाऊन लावून जवळपास ५० टक्के जनतेला लसीकरण केलं. आत्ताचं तिथलं चित्र म्हणजे रुग्णालयावरचा ताण कमी झाला आहे. मृत्यूदर कमी झाला आहे. त्याच मार्गाने आपल्याला जावं लागेल, लसीकरण वाढवावं लागेल. जेणेकरून पुढची लाट आपण थोपवू शकू.

आपण एकदा कोविडवर नियंत्रण मिळवून दाखवलंय. पण यावेळी चित्र वेगळं आहे. आरोग्य सुविधा तोकडी पडताना आपल्याला दिसत आहे. आपण जिद्दीने आपण लढणार आणि जिंकणार आहोत. पण ही रुग्णवाढ भयावह आहे. ऑक्सिजनचा वापर जास्त करावा लागतोय. त्यामुळे बेड्स, ऑक्सिजनची कमतरता जाणवू लागली आहे. ती वाढवण्यासाठी आपण शक्य ते सगळं करत आहोत.

निवृत्त झालेल्या डॉक्टर, परिचारिकांना मी आवाहन करतोय, की तुम्ही सगळ्यांनी मदतीला, लढायला पुढे या. सर्व स्वयंसेवी संस्था, व्यक्ती यांना आवाहन करतो की जे काही तुम्ही करू शकाल आणि जे शक्य आहे ते करण्यासाठी तुम्ही सरकारच्या सोबत या. ही उणीदुणी काढण्याची वेळ आहे. सर्व राजकीय पक्षांना माझं आवाहन आहे. आता उणीदुणी काढत बसलो, तर महाराष्ट्र आपल्याला माफ करणार नाही. पंतप्रधानांनाही मी हीच विनंती केली की देशातल्या सर्व प्रमुख राजकीय पक्षांना आवाहन करा की राजकारण बाजूला ठेवा. आपण एकसाथ लढायला हवं, तरच आपल्याला या साथीवर नियंत्रण मिळवता येईल.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने