जाहिरात... Advertisement... विज्ञापन

🙏

🙏🏻

चंद्रपूर जिल्ह्यात 11 मे पर्यंत कोरोना वाढीचा धक्कादायक अंदाज.

Bhairav Diwase. May 02, 2021
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना वाढीचा धक्कादायक अंदाज पुढे आला आहे. सध्या जिल्ह्यात 17 हजारांच्या जवळपास सक्रिय रुग्ण आहेत. 11 मे पर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात सक्रिय बाधितांची संख्या 40 हजारांवर पोचण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. व्हेंटिलेटर बेडच्या अभावामुळे आणीबाणीची स्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नवी अंदाजे आकडेवारी आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.

चंद्रपूर हा औद्योगिक जिल्हा आहे. पहिल्या कोरोना लाटेत या जिल्ह्यात जिल्हाबंदी आणि लॉकडाऊनचे पालन कठोरपणे करण्यात आले.त्याचा परिणाम म्हणून जिल्ह्यात कोरोना बऱ्यापैकी नियंत्रणात आला होता. मात्र दुसऱ्या लाटेत जिल्हाबंदी केली नाही. तसेच औद्योगिक उत्पादने पूर्ण शक्तिनिशी सुरू असल्याने कोरोना आता नियंत्रणाबाहेर जाण्याची चिन्हे आहेत. सध्या बाधितांची संख्या १७ हजाराच्या घरात आहे तरी, आरोग्य खात्याच्या अंदाजित आकडेवारीनुसार ११ मे पर्यंत हा आकडा धक्कादायकरीत्या ४० हजार एवढा वाढू शकतो.

चंद्रपूर जिल्ह्यात सध्या सरासरी १४०० रुग्ण रोज आढळून येत आहेत. तर एकूण बाधितांची संख्या ५९ हजार एवढी आहे. आजवर जिल्ह्यात 880 मृत्यू झाले आहेत. जिल्ह्याचा मृत्युदर १.४९ टक्के झाला आहे. यात सर्वात काळजीची बाब म्हणजे जिल्ह्याचा डबलिंग रेट हा ३८ दिवसांवर आला आहे.

नवी अंदाजीत आकडेवारी खरी मानायची झाल्यास जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सुसज्ज केली जात आहे. जिल्ह्यात असलेल्या 1067 एकूण बेड संख्येच्या सोबतच ग्रामीण भागात ४७५, जिल्हा स्थानी ५०० बेडचे जम्बो हॉस्पिटल तर इतरही ठिकाणी अन्य १३५० बेडचे नियोजन करण्यात आले आहे. 11 मे पर्यंत अतिगंभीर रुग्णांची संख्या ४०० एवढी पोहोचणार असून, जिल्ह्यात वेंटीलेटर आवश्यक असणाऱ्या रुग्णांची संख्या 200 वर पोहोचणार आहे. त्यामुळेच प्रशासनाने तातडीने व्हेंटिलेटरची मागणी नोंदविली आहे.

एकीकडे बेडची संख्या वाढवण्याबाबत जोरदार हालचाली सुरू आहे तर दुसरीकडे जिल्ह्यातील मुख्य शासकीय कोविड रुग्णालय आणि महिला रुग्णालयात दोन स्वतंत्र ऑक्सीजन प्लांट कार्यान्वित करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील सध्याची ऑक्सिजन क्षमता ही ३२ मेट्रिक टन असून सध्या २४ मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे. याशिवाय तालुकास्थानी असलेल्या उपजिल्हा आणि तालुका रुग्णालयात देखील स्वतंत्र ऑक्सीजन प्लांट उभारणीसाठी निधी मंजूर करत कामाला सुरुवात करण्यात आली आहे. ऑक्सीजन सोबतच हवेतून ऑक्सिजन निर्माण करणारे यंत्र देखील उभारले जात आहेत.

नव्या अंदाजे आकडेवारीमुळे जिल्ह्यात कोरोनाचा महाउद्रेक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचा मुकाबला करण्यासाठी प्रशासनाने केलेले नियोजन वेळेत पूर्ण करावे, एवढीच सर्वांची अपेक्षा आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत