Bhairav Diwase. May 14, 2021
आरमोरी:- माजी आमदार आनंदराव गेडाम यांचे पुत्र लॉरेन्स गेडाम यांनी बुधवारी संध्याकाळी कोविड केअर सेंटरमधील डॉक्टरला मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्यावर विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. गुरुवारी न्यायालयाने एक दिवसाचा पीसीआरसुद्धा दिला. दरम्यान, या घटनेचा विविध स्तरांतून निषेध व्यक्त केला जात आहे.
डॉ. अभिजीत मारबते हे कोविड सेंटरमध्ये आपल्या कर्तव्यावर असताना सायंकाळच्या सुमारास लाॅरेन्स गेडाम हे गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांना गोळ्या मागण्यासाठी सेंटरमध्ये गेले. पण गोळ्या दिल्यानंतर लाॅरेन्स यांनी तुमच्या गोळ्या बरोबर नाहीत, असे म्हणून गोळ्यांचे पाकीट डॉक्टरच्या अंगावर फेकले. त्यानंतर डॉ. मारबते यांना शिवीगाळ करीत मारहाण सुरू केली.
याप्रकरणी लॉरेन्स यांच्याविरुद्ध भादंवि कलम ३५३, ३३२, २९४, ५०४ आणि इतर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेनंतर लाॅरेन्सने पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. आरमोरी ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पंकज बोंडसे हे तपास करीत आहेत.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळीही अपक्ष उमेदवार बग्गुजी ताडाम यांच्या अपहरण प्रकरणात लॉरेन्सवर गुन्हा दाखल झाला आहे.