बाबुपेठ येथील घटे जिमवर २० हजारांचा दंड.

Bhairav Diwase

Bhairav Diwase. May 13, 2021
चंद्रपूर:- राज्य शासनाच्या निर्देशानुसार अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, प्रतिष्ठाने, बाजारपेठ बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तरी सुद्धा शहरातील काही व्यावसायिक आपली प्रतिष्ठाने सुरु ठेवून कोरोना नियमांचे उल्लंघन करीत आहेत. अशा प्रतिष्ठानांवर मनपाद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. गुरुवारी (ता. १३) बाबुपेठ येथील घटे जिमविरुद्ध कारवाई करून २० हजारांचा दंड आकारण्यात आला.
मनपा आयुक्त राजेश मोहिते यांच्या निर्देशानुसार सहायक आयुक्त विद्या पाटील यांच्या नेतृत्वात झोन क्रमांक ३ चे मुख्य स्वच्छता निरीक्षक आणि सुरक्षा अधिकारी राहुल पंचभुते व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कारवाई करण्यात आली. कोरोना नियमांचे उल्लंघन करीत बाबुपेठ येथील घटे जीम सुरु असल्याची माहिती मिळाली. धाड घातली असता येथे जवळपास १०-१२ तरुण जीममध्ये आढळून आले. या प्रकरणी घटे जिमविरुद्ध कारवाई करून २० हजारांचा दंड आकारण्यात आला. यापुढेही नियमांचे उल्लंघन केल्यास प्रसंगी प्रतिष्ठान सील करण्यात येईल, अशी ताकीद मनपाकडून देण्यात आली.