स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) किशोर माहोरकर पोंभुर्णा
पोंभूर्णा:- चंद्रपूर जिल्ह्यात अवैध दारू तस्करांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेचे धाड सत्र सुरू आहे. यातच पोंभूर्ण्यात अवैध दारू विक्री व दारूचा साठा लपवून ठेवले असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून पोंभूर्णा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील कसरगट्टा मार्गावरील शेतशिवारात धाड टाकून देशी विदेशी दारूच्या ३३ पेट्या व मुद्देमाल असा एकूण ३ लक्ष ९३ हजार २०० रूपयाचा माल जप्त केले.
पोंभूर्णा तालुक्यात मोठ्या प्रमाणात दारू विक्री होत असून पोंभूर्णा येथील शेख जब्बार नावाच्या इसमाने कसरगट्टा मार्गावरील शेतात अवैध देशी विदेशी दारूचा साठा लपवून ठेवले असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून पोंभूर्ण्यात दाखल झाले. पोंभूर्ण्यापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेल्या कसरगट्टा मार्गावरील शेख जब्बार यांच्या शेतात पथक पोहचताच शेख जब्बार हा इसम घटनास्थळावरुन पळून गेला.
शेतात धाड मारली असता त्या ठिकाणी ३० पेट्या देशी दारू, ३ पेट्या विदेशी दारू व दुचाकी वाहन जप्त करण्यात आले. देशी, विदेशी दारू व दुचाकी वाहन असे एकूण ३ लक्ष ९३ हजार २०० रुपयांच्या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपीविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, पोलिस उप निरीक्षक सचिन गदादे, अमजद खान, अविनाश दशमवार, गजानन नागरे यांनी यशस्वीपणे पार पाडली.
पुढील तपास पोंभूर्णा पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दादाजी ओललवार करीत आहेत.