देशी दारुसह ५ लक्ष ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

Bhairav Diwase
भद्रावती पोलिसांची ढोरवासा येथे कारवाई


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे, भद्रावती
भद्रावती:- भद्रावती तालुक्यातील अवैधरीत्या देशी दारूची वाहतूक करणाऱ्या कारमधून ४० हजाराच्या देशी दारुसह एकूण ५ लक्ष ४० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात भद्रावती पोलिसांना यश आले आहे.
सदर कारवाई भद्रावती पोलिसांनी १२ मे रोजी बुधवारी तालुक्यातील ढोरवासा गावाजवळील एका सिमेंट विटा तयार करणाऱ्या कंपनीजवळ केली. वर्धा नदीचे पात्र जवळपास कोरडे पडत असल्याने नदी पात्रातून आडमार्गाने दारूची आयात मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. अवैध दारूविक्रेत्यांवर पाळत ठेवणाऱ्या एका पोलीस पथकाला पांढऱ्या रंगाची टाटा इंडिका कार ढोरवासा गावाजवळील सिमेंट विटा तयार करणाऱ्या कंपनीजवळ आढळली. मात्र पोलीस पाहून चालकांनी कार उभी करून पळ काढला. कारची तपासणी केली असता त्यात ४०० नग देशी दारूच्या जवळपास ४० हजार रुपये किंमतीच्या देशी दारूच्या बॉटला आढळून आल्या.पोलिसांनी ५ लक्ष रुपये किंमतीची कार व ४० हजार रुपये किंमतीची देशी दारु असा एकुण ५ लक्ष ४० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. घटनेचा पुढील तपास ठाणेदार सुनील सिंग पवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस पथक करीत आहे.