Top News

वरोरा गोळीबार प्रकरण

स्थानिक गुन्हे शाखेने 24 तासांच्या आत आरोपींना ठोकल्या बेड्या.


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
वरोरा:- वरोरा येथील अबिद शेख या युवकाची शनिवारी (ता. १५) रात्रीच्या सुमारास तिघांनी गोळीबार करून हत्या केली. त्यानंतर मारेकरी फरार झाले. मारेक-यांना जोपर्यंत अटक करीत नाहीत, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका मृताच्या कुटुंबीयांनी घेतली. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयात मोठा तणाव निर्माण झाला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांनी तपासाची सूत्रे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्याकडे सोपविली.
 त्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरवित मारेक-यांना गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथील जंगलातून ताब्यात घेतले. देवा नौकरकर, गौरव वाळके अशी अटकेतील मारेक-यांची नावे आहेत.
पंचायत समिती कार्यालयनजीक अंबादेवी वॉर्ड रोडलगत एका टिनाच्या शेडमध्ये अबिद शेख हा आपल्या काही सहका-यासह बसला होता. त्याचदरम्यान देवा नौकरकर, गौरव वाळके हे दोघे आपल्या सहका-यासह तोंडाला रुमाल बांधून दुचाकी वाहनाने तेथे आले. आबिद शेख याच्यावर गोळीबार करून निघून गेले. यात अबिद शेख हे गंभीररित्या जखमी झाले. मारेक-यांनी हत्येसाठी वापरलेली बंदूक शेख याच्या शरीरावर ठेवून घटनास्थळावरून पळ काढला.
त्यानंतर वरोरा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळावरून एक बंदूक, एक दुचाकी वाहन पोलिसांनी जप्त केले. जखमी अवस्थेत अबिद शेख याला उपचारार्थ उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिका-यांनी त्याला मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच मृताचे कुटुंबीय, नातेवाईकांनी उपजिल्हा रुग्णालयात गर्दी केली. जोपर्यंत मारेक-यांना अटक करत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. त्यानंतर पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांनी आरोपीच्या अटकेसाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्याकडे तपासाची सूत्रे सोपविली. त्यानंतर एलसीबीचे तीन, वरोरा, भद्रावतीचे प्रत्येकी एक पथक आणि सायबर सेलचे एक पथक वेगवेगळ्या ठिकाणी रवाना करण्यात आले.
 एलसीबीच्या पथकाने वरो-यातील दोन युवकांना ताब्यात घेऊन चौकशी केली. यावेळी ते दोघे मुख्य सूत्रधाराच्या संपर्कात असल्याचे समोर आले. सायबर सेलने मुख्य आरोपीचे लोकेशन ट्रेस केले. यात देवा नौकरकर, गौरव वाळके हे दोघे गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी परिसरात असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अहेरीच्या दिशेने रवाना झाले. अहेरी जंगल परिसरात शोध मोहीम राबवून लपून बसलेल्या देवा नौकरकर, गौरव वाळके या दोघांना ताब्यात घेतले. पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. तब्बल वीस तासांनंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने