पाणीपुरीच्या वादातून बायकोने विष प्राशन करून केली आत्महत्या. #Suicide #panipuri


पुणे:- पतीने कामावरून जाताना पाणीपुरी आणली. परंतु, मला न विचारता पाणीपुरी का आणली, असे विचारत पत्नीने वाद घातला. मात्र, त्या वादाचा विपर्यास होऊन पत्नीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.
प्रतीक्षा गहिनीनाथ सरवदे (वय २३, रा. आंबेगाव पठार,) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी पती गहिनीनाथ सरवदे (वय ३३) याला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत प्रकाश भिसे (वय ५५) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
गहिनीनाथ आणि प्रतीक्षा यांचे २०१९ मध्ये लग्न झाले होते. उच्चशिक्षित असलेला गहिनीनाथ एका चांगल्या कंपनीत नोकरीला आहे. या दोघांना एक मुलगाही आहे. नोकरीला असल्यामुळे गहिनीनाथ पुण्यात तर पत्नी गावाकडे राहत होती. काही दिवसांपूर्वी त्याने पत्नीला पुण्यात आणले होते. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आंबेगाव पठार परिसरात ते वास्तव्यास होते.
दोन दिवसांपूर्वी गहिनीनाथ यांनी कामावरून घरी परत जात असताना घरी पाणीपुरी नेली होती. प्रतीक्षा हिने मला न विचारता पाणीपुरी का आणली, असे विचारत पतीसोबत वाद घातला. यावरूनच मागील दोन दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू होता.
या वादानंतर पुढील दोन दिवस गहिनाथ कामावर जाताना डब्बा घेऊन जात नव्हता. या दोघांमध्ये त्या दोन दिवसात देखील किरकोळ वाद सुरूच होते. यातून प्रतीक्षाने शनिवारी विषारी औषध प्यायले. त्यानंतर प्रतिक्षाला तात्काळ जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान प्रतीक्षाचा मृत्यू झाला. या प्रकरणी पती गहिनाथला अटक केली असून तपास सुरू असल्याचे भारती विद्यापीठ पोलिसांकडून सांगण्यात आले.
पती-पत्नीमध्ये घरगुती वादासह पाणीपुरी न खाण्यावरून भांडण झाले होते. त्याच रागातून पत्नीने विष पिऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी पतीला अटक करण्यात आली असून तपास सुरू आहे.
सचिन धामणे, सहायक पोलीस निरीक्षक
भारती विद्यापीठ पोलीस ठाणे, पुणे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत