Top News

नोकरी बनावट प्रकरण; बल्लारपूरातील एकावर गुन्हा दाखल. #Crime

सावधान.......
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- तत्कालीन जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची संगणकीकृत स्वाक्षरी करून युवकांना नोकरीचे बनावट आदेश दिल्याचे प्रकरण मंगळवारी समोर आले. #Crime
प्रकरण गंभीर असल्याचे बघून बुधवारी (ता. १५) जिल्हा परिषद प्रशासनाने रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. युवकांनी बल्लारपुरातील ब्रिजेशकुमार बैद्यनाथ झा यांनी फसवणूक केल्याचे सांगितले.
त्या अनुषंगाने पोलिसांनी ब्रिजेशकुमार बैद्यनाथ झा याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. बनावट आदेश देऊन जिल्ह्यातील २० ते २२ युवकांची फसवणूक झाल्याची माहिती आहे. नोकरीचे बनावट आदेश तयार करून देण्यास एखादी टोळी असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. त्यादृष्टीने आता पोलिस तपास करणार असल्याची माहिती आहे.
कोरोनाच्या काळात अनेक युवकांच्या नोकऱ्या गेल्या. मिळेल ते काम युवक कोरोना काळात करीत होते. याच काळात बल्लारपुरातील सरदार पटेल वॉर्डातील ब्रिजेशकुमार बैद्यनाथ झा याने गावातील काही युवकांशी ओळख वाढविली. कोरोनाच्या काळात युवकांना नोकरीची गरज होती. हेच हेरून ब्रिजेशकुमार झा याने काही युवकांना हेरले.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात भरतीची प्रक्रिया राबविणार असल्याचे झा यांनी युवकांना सांगितले. तुम्हाला मी नोकरीवर लावून देतो असे सांगून ब्रिजेशकुमार यांनी त्यांच्याकडून पैसे घेतले. त्यानंतर काही महिन्यांनी जिल्हा परिषदेतील कनिष्ठ साहायक व परिचराच्या नोकरीचे बनावट आदेश त्यांच्या माथी मारले. तत्कालीन जिल्हाधिकारी आणि तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांची संगणकीकृत स्वाक्षरी चोरून हे आदेश तयार करण्यात आले. हातात नियुक्तीचे आदेश आल्याने दोन ते तीन युवक नऊ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेत आले. त्यांनी थेट मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांची भेट घेतली.
त्यांना नोकरीच्या नियुक्तीचे आदेश दाखविले. जिल्हा परिषदेने येत्या काही महिन्यांत भरतीची कोणतीही प्रक्रिया राबविली नाही. त्यामुळे त्यांनी आरोग्य विभागात चौकशी केली. तेव्हा कोणतीही भरती प्रक्रिया राबविण्यात आली नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांनी युवकांच्या नोकरीचे नियुक्तीचे आदेश बघितले. तेव्हा त्यांना धक्काच बसला. ते आदेश बनावट असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर युवकांकडून सविस्तर माहिती जाणून घेण्यात आली.
तेव्हा त्यांनी बल्लारपुरातील झा यांचे समोर केले. बुधवारी (ता. १५) जिल्हा परिषद प्रशासनाने रामनगर पोलिसा ठाण्यात तक्रार दाखल केली. दरम्यान, नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्यांपासून युवक-युवतींनी सावध राहावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखर्डे यांनी केले आहे.
जिल्हा परिषद प्रशासनाने तक्रार दाखल केली आहे. रामनगर पोलिसांनी झा याच्याविरूद्ध भादंवी ४६५, ४६८, ४७१ आणि ४२० कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.-
मधुकर गिते, ठाणेदार,
रामनगर पोलिस स्टेशन.
लाखो रुपयांचा गंडा......

बल्लारपुरातील दोन ते तीन युवकांनी नोकरीसाठी पाच ते दहा लाख रुपये दिले होते. जिल्ह्यातील आणखी काही बेरोजगार युवकांना झा यांनी गंडा घातला असल्याची माहिती आहे. नोकरीसाठी काही युवकांकडून पंधरा ते वीस लाख रुपयेही घेण्यात आल्याची माहिती आहे. नोकरीचे बनावट आदेश प्रकरणात आणखी काही जण सहभागी असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने