पोंभूर्णा शिवसेनेचा वीज वितरणला अल्टिमेटम. #Electric #Pombhurna

Bhairav Diwase
वारंवार वीज खंडित प्रकरणी शिवसेना उग्र आंदोलन करणार.

पोंभुर्णा:- पोंभूर्णा शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात सतत विजेचा लपंडाव सुरू आहे. सतत वीज खंडित होत असल्याने नागरिक वैतागून गेले आहेत. थोडाही वारा व पाऊस आला की गावातील बत्ती गुल होत असते. याबद्दल शिवसेनेचे तालुका प्रमुख आशिष कावटवार व महिला आघाडी तालुका प्रमुख तथा आष्टा ग्रामपंचायतच्या सरपंचा किरण डाखरे यांच्या नेतृत्वात वीज वितरण कंपनीला निवेदन देण्यात आले असून वीजेची समस्या त्वरित मार्गी लावण्याची मागणी यातून करण्यात आली आहे. आठवडाभरात वीज समस्या सोडवण्यात आली नाही तर विज वितरण कार्यालयासमोर शिवसेना उग्र आंदोलन करणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

वारंवार वीज खंडित होणे व वीज वितरणच्या भोंगळ कारभारामुळे वीज वितरण विरोधात सर्वत्र रोष व्यक्त होत आहे. विजेअभावी पाणी पुरवठा यंत्रणा अपयशी ठरत आहे. नागरिकांना सुरळीत पिण्याचे पाणी मिळत नाही. गेल्या अनेक दिवसांपासून तालुक्यात विजेचा लपंडाव सुरू आहे. दिवसभरात अनेकदा वीज पुरवठा खंडित होत असते. रात्री बत्ती गुल झाली तर सकाळ पर्यंत वीजेचा पत्ता राहात नाही. यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप होत आहे.
अनेकदा वीजेच्या कमी-जास्त होणाऱ्या प्रवाहामुळे कित्येक नागरिकांचे वीज उपकरणे निकामी होत आहेत. यामुळे नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसावे लागत आहे. विद्युत प्रवाहाची अशीच स्थिती राहिल्यास जीवितहानी होण्याची शक्यताही नाकारता येणार नाही. सदर गंभीर समस्यांना घेऊन पोंभूर्णा तालुका शिवसेना पदाधिकाऱ्यांनी वीज वितरणचे उप कार्यकारी अभियंता गेडाम यांना तक्रारीचे निवेदन देण्यात आले. अनियमित वीज पुरवठा सुरळीत करून नागरिकांना दिलासा द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख आशिष कावटवार, आष्टा ग्रामपंचायत सरपंच तथा शिवसेना महिला तालुका प्रमुख किरण डाखरे,तालुका समन्वयक विजय वासेकर,युवासेना तालुका प्रमुख अभिषेक बद्दलवार,महेश श्रिगिरिवार, ग्रामपंचायत सदस्य अर्चना दिवसे, लता वडस्कर, किशोर डाखरे, सुभाष पोतराजे, विनोद वडस्कर, संदीप पोतराजे, संतोष बोडेकर, श्रीरंग कोसरे, पुरूषोत्तम शेडमाके व शेकडो महिला व गावकरी उपस्थित होते.