Top News

"त्यांच्या" नशीबी रस्तेही नाहीत? #Road #medical

१२ वर्षीय मुलीच्या उपचारासाठी तब्बल ३० किलोमीटरची पायपीट.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
भामरागड:- गडचिरोली जिल्ह्याच्या आणि राज्याच्या पूर्व टोकावरील भामरागड तालुक्यातील नागरिक स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आला तरी मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित आहेत. साधे रस्तेही त्यांच्या नशिबी नाहीत. त्यामुळे पायवाटेने प्रवास करण्याशिवाय त्यांना उपाय नाही.
रुग्णांना उपचारासाठी आणायचे असेल तरीही अनेक किलोमीटर चालत यावे लागते. मेटेवाडा गावातील एका १२ वर्षीय आजारी मुलीला कावड करीत तब्बल ३० किलोमीटर पायी चालून लाहेरीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आणावे लागले.
मेटेवाडासारख्या कित्येक आदिवासी गावांमध्ये विकासाचा सूर्य उगवलेलाच नाही. सोमवारी दुपारी छत्तीसगड सीमेवरील त्या राज्याच्या हद्दीत येणाऱ्या मेटेवाडा येथील मुरी पांडू पुंगाटी (१२) या मुलीची प्रकृती बिघडली. त्यामुळे नातेवाईकांनी तिला खाटेची कावड करून ३० किलोमीटर चालत लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणावे लागले.
छत्तीसगडच्या हद्दीत येणाऱ्या नारायणपूर जिल्ह्यातील ओरसा तालुक्यातील मेटेवाडा या गावात १२ आदिवासी घरांची वस्ती आहे. ते लोक गवताचे झाडू बनवून लाहेरी व भामरागडच्या बाजारात अत्यल्प मोबदल्यात विक्री करून गुजराण करतात.
लाहेरीपासून त्यांच्या गावाचे अंतर ३० किलोमीटर आहे. मार्गात मोठाल्या डोंगर-दऱ्या आहेत. त्या परिसरातील नागरिक दैनंदिन वापरातील वस्तूंसह सर्व प्रकारच्या खरेदीसाठी लाहेरीच्याच बाजारात येत असतात. एवढेच नाही तर उपचारासाठीही लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्राशिवाय जवळचे दुसरे उपचार केंद्र नाही.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने