Top News

मुल शहराच्‍या विकासासाठी सदैव वचनबध्‍द:- आ. सुधीर मुनगंटीवार. #Mul

क्रिडा संकुल, जलतरण तलाव, वार्ड नं. १ मधील शाळेचे लोकार्पण संपन्‍न.
मुल:- मुल शहरातील नागरिकांनी माझ्यावर, भारतीय जनता पार्टीवर नेहमीच भरभरून प्रेम केले आहे. आम्‍हीही या शहराचा सर्वांगिण विकास करण्‍याचा प्रामाणिकपणे प्रयत्‍न केला. नागरिकांच्‍या प्रेमाच्‍या ऋणातुन आम्‍ही कधिही मुक्‍त होवू शकणार नाही. आज मुल शहरातील नागरिकांना क्रिडा संकुल, जलतरण तलाव या विकासकामांबाबत दिलेला शब्‍द पूर्ण करत लोकार्पण करताना मनापासून आनंद होत आहे. नागरिकांना आजवर विकासासंदर्भात दिलेला प्रत्‍येक शब्‍द मी प्राधान्‍याने पूर्ण केला आहे. या शहराच्‍या विकासासाठी सदैव वचनबध्‍द असल्‍याचे प्रतिपादन लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
दिनांक ३० ऑक्‍टोंबर २०२१ रोजी मुल शहरात ५ कोटी ५२ लाख रूपये खर्चुन बांधण्‍यात आलेल्‍या नगर परिषदेच्‍या शाळेचे, ३ कोटी रू. खर्चुन बांधण्‍यात आलेल्‍या क्रिडा संकुलाचे तसेच २ कोटी रू. खर्चुन जलतरण तलावाचे लोकार्पण संपन्‍न झाले. या निमीत्‍ताने आयोजित सभेत आ. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा सौ. संध्‍या गुरनुले, भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे, मुलच्‍या नगराध्‍यक्षा सौ. रत्‍नमाला भोयर, उपनगराध्‍यक्ष नंदू रणदिवे, भाजपा मुल अध्‍यक्ष प्रभाकर भोयर, भाजयुमो जिल्‍हाध्‍यक्ष आशिष देवतळे, नामदेव डाहूले, नगर परिषद सदस्‍य चंद्रकांत आष्‍टनकर, विनोद सिडाम, प्रशांत समर्थ, अजय गोगुलवार, मिलींद खोब्रागडे, अनिल साखरकर, सौ. शांता मांदाडे, प्रशांत समर्थ, वनमाला कोडापे, विद्या बोबाटे, सौ. रेखा येरणे, सौ. आशा गुप्‍ता, प्रशांत लाडवे, सौ. संगीता वाळके, सौ. वंदना वाकडे, महेंद्र करकाडे, विनोद सिडाम, सौ. प्रभा चौथाले, सौ. मनिषा गांडलेवार, मुल पंचायत समितीचे सभापती चंदू मारगोनवार आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आ. सुधीर मुनगंटीवार पुढे म्‍हणाले, सुदृढ व सशक्‍त देशासाठी शरीर सौष्‍ठव अतिशय महत्‍वाचे आहे. यादृष्‍टीने मुल शहरात ३ कोटी रू. खर्चुन अत्‍याधुनिक क्रिडा संकुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. या शहरात जलतरण तलाव व्‍हावा अशी मागणी नागरिकांनी केली होती. ही मागणी सुध्‍दा आज पूर्ण झाली आहे. नगर परिषदेच्‍या माध्‍यमातुन ५ कोटी ५२ लाख ८५ हजार रू. निधी खर्चुन वार्ड नं. १ मध्‍ये शाळा बांधकाम करण्‍यात आले. या शाळेचे सुध्‍दा आज लोकार्पण करण्‍यात आले. शाळांची दर्जावाढ व्‍हावी, शाळा अत्‍याधुनिक व्‍हाव्‍या, या शाळांच्‍या माध्‍यमातुन ज्ञानासोबत संस्‍कार मिळावे यासाठी आम्‍ही नेहमीच प्रयत्‍नशील राहीलो आहोत. पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ चा नारा दिला. त्‍याला अनुसरून बल्‍लारपूर शहरात आम्‍ही मुलींसाठी डिजीटल शाळेचे बांधकाम करीत आहोत. ही शाळा महाराष्‍ट्रातील आगळी वेगळी डिजीटल शाळा ठरेल याचा मला विश्‍वास आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्‍यांसाठी टाटा ट्रस्‍टच्‍या सहकार्याने संगणकीय शिक्षण उपलब्‍ध करण्‍यासाठी आम्‍ही बसेस उपलब्‍ध केल्‍या. बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्रातील ३०० च्‍या वर आंगणवाडी आदर्श करण्‍यात आल्‍या. या अंगणवाडया आनंदवाडी झाल्‍याचा मला मनापासून आनंद आहे, असेही आ. मुनगंटीवार यावेळी बोलताना म्‍हणाले.


यावेळी बोलताना आ. मुनगंटीवार पुढे म्‍हणाले, नागरिकांच्‍या प्रेमाच्‍या व विश्‍वासाच्‍या बळावर विविध विकासकामे आम्‍ही पूर्णत्‍वास आणली. मुल शहरात ८ कोटी रू. निधी खर्चुन मुख्‍यमंत्री कर्मवीर मा. सा. कन्‍नमवार स्‍मृती सांस्कृतीक सभागृहाचे बांधकाम, ७.५० कोटी रू. निधी खर्चुन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम, आदिवासी मुलांचे व मुलींचे शासकीय वसतीगृहांचे बांधकाम, ११ कोटी रू. निधी खर्चुन बसस्‍थानकाचे आधुनिकीकरण व नुतनीकरणाचे काम, २८ कोटी रू. निधी खर्चुन पाणी पुरवठा योजना पूर्ण, मुल शहरात माळी समाजाच्‍या विद्यार्थ्‍यांसाठी स्‍वतंत्र वसतीगृहाचे बांधकाम, ३ कोटी १२ लक्ष रू. निधी खर्चुन इको पार्कचे बांधकाम, डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय इमारतीचे बांधकाम, औद्योगिक प्रशिक्षण संस्‍थेत अतिरिक्‍त कार्यशाळेचे बांधकाम, मुल शहरातील मुख्‍य मार्गाचे सिमेंटीकरण तसेच अंतर्गत रस्त्यांचे सिमेंटीकरण, मुल शहरातील वळण मार्गाचे बांधकाम, मुल शहरातील आठवडी बाजार बांधकामासाठी ११ कोटी रू. निधी मंजुर, पत्रकार भवनाचे बांधकाम, पंचायत समितीचे बांधकाम, विश्रामगृहाचे बांधकाम आदी विकासकामे आम्‍ही पूर्णत्‍वास आणली.
मी मंत्री असताना संजय गांधी निराधार योजनेच्‍या अनुदानात वाढ करू शकलो याचा आनंद आहे. जिल्‍हयात १४ पेक्षा जास्‍त प्राथमिक आरोग्‍य केंद्राच्‍या नविन इमारतीचे बांधकाम आम्‍ही केले. अद्याप ही प्राथमिक आरोग्‍य केंद्रे सुरू झाली नसली तरीही यासाठी यंत्रसामुग्री व उपकरणे उपलब्‍ध करण्‍यासाठी आपला प्रयत्‍न व पाठपुरावा सुरू आहे. जिल्‍हयासाठी शासकीय वैद्यकिय महाविद्यालय आपण सुरू केले, टाटा ट्रस्‍टच्‍या सहकार्याने कॅन्‍सर हॉस्‍पीटल आपण सुरू करीत आहोत, रूग्‍णवाहीका उपलब्‍ध केल्‍या, सोमनाथ येथे शासकीय कृषी महाविद्यालय आपण सुरू केले तसेच या कृषी महाविद्यालयाच्‍या इमारतीसाठी ७५ कोटी रू. निधी मंजूर करण्‍यात आला. अजयपूर येथे पंजाब नॅशनल बॅंकेच्‍या सहकार्याने शेतकरी प्रशिक्षण केंद्र आपण सुरू करीत आहोत.चिंचाळा व लगतच्या गावांसाठी बंद वितरण नलिका प्रणाली द्वारे सिंचन सुविधा उपलब्ध केली. सोमनाथ येथे सभागृहासाठी 1 कोटी रू निधी मंजूर केला.  मुल शहर आणि ग्रामीण भागाच्‍या विकासासाठी आपण सदैव वचनबध्‍द असून हा परिसर सर्वसोयी सुविधांनी परिपूर्ण व्‍हावा हा आपला प्रयत्‍न राहणार आहे, असेही आ. मुनगंटीवार यावेळी बोलताना म्‍हणाले. 
यावेळी घर पडून नुकसान झालेल्‍या नागरिकांना मदतीचे धनादेश वितरीत करण्‍यात आले. त्‍याचप्रमाणे ग्रामीण भागातील नागरिकांना पट्टे वाटप करण्‍यात आले. यावेळी जिल्‍हा परिषद अध्‍यक्षा सौ. संध्‍या गुरनुले, मुलच्‍या नगराध्यक्षा सौ. रत्‍नमाला भोयर यांचीही भाषणे झालीत. कार्यक्रमाना नागरिकांची मोठया संख्‍येने उपस्थिती होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने