कुंकवाच्या धन्याने गाठली जुलूमाची परिसीमा! #arrest

Bhairav Diwase
पत्नीला मारहाण करून मित्राच्या खोलीत सोडले.
(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
यवतमाळ:- मित्राला फोन लावून त्याच्याशी बोल म्हणून पत्नीला आग्रह धरला. ती ऐकत नाही असे दिसल्यावर मारहाण केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मित्राला घरी बोलावून तो थांबलेल्या खोलीत पत्नीला फरफटत नेऊन सोडले.
दारूच्या नशेत पतीच्या मित्राने अत्याचार केल्याची महिलेची तक्रार आल्यानंतर बिटरगाव पोलिसांनी पतीसह त्याच्या मित्राविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे.
उमरखेड तालुक्यातील ढाणकी येथे १७ नोव्हेंबरच्या रात्री हा धक्कादायक गुन्हा घडला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने बिटरगाव पोलिसात तक्रार दिली आहे. पती दारू पिऊन घरी आला व त्याच्या एका मित्राला फोन लावून देऊन तू त्याच्याशी बोल, असा आग्रह त्याने धरला. पत्नीने बोलण्यास नकार दिल्यानंतर तिला मारहाण करण्यात आली. त्यानंतर पतीच्या भीतीने त्याच्या मित्राशी ती फोनवर बोलली.
त्यानंतर १७ नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास पती सदर मित्राला सोबत घेऊन थेट घरातच दाखल झाला. रात्री उशिरापर्यंत त्या दोघांनी यथेच्छ पार्टी झोडली. त्यानंतर मित्र वेगळ्या खोलीत झोपण्यासाठी गेल्यानंतर पतीने पत्नीला मित्रासोबत शारीरिक संंबंध ठेवण्यासाठी बळजबरी केली. एवढ्यावरच न थांबता मारहाण करीत तिला मित्राच्या रुममध्ये फरफटत नेऊन ढकलून दिले आणि स्वत: पतीनेच रुमचा दरवाजा बाहेरून लावून घेतला.
त्यानंतर पतीच्या मित्राने अत्याचार केल्याची तक्रार पीडित महिलेने बिटरगाव ठाण्यात दिली. त्यावरून या प्रकरणात वरील दोन्ही आरोपींविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डाॅ. दिलीप पाटील भुजबळ, अपर पोलीस अधीक्षक डाॅ. के. ए. धरणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक प्रदीप पाटील यांनी घटनास्थळाला भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या. घटनेनंतर पसार झालेल्या दोन्ही आरोपींना पोलिसांनी अवघ्या दोन तासामध्ये अटक केली. अधिक तपास पोलीस करीत आहेत.