Top News

शरद पवारांचा काँग्रेसला इशारा; पटोलेंकडून पवारांना प्रत्युत्तर. #Chandrapur


चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी मूलमध्ये बोलताना काँग्रेसला चांगलाच इशारा दिला आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विदर्भातील 'राष्ट्रवादीचे दुकान बंद करू' अशी भाषा केली होती. यावर गडचिरोलीमध्ये बोलताना देखील पवारांनी पटोलेंना टोला लगावला होता. त्यांनी म्हटलं होतं की, नाना पटोले बोलू शकतात, आम्ही नाही बोलू शकत. आम्हाला सरकार आणि संघटनाही चालवायची आहे. पवारांचे हे वक्तव्य प्रत्युत्तर मानलं जात आहे. सोबतच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस 50 टक्के जागा महिलांना देणार असल्याचे आणि विधानसभा निवडणुकीत 40 टक्के जागा सामान्य-तरुण कार्यकर्त्यांना देण्याचे जाहीर केले.
शरद पवार यावेळी म्हणाले की, कोळशाच्या प्रदूषणाची किंमत चंद्रपूर जिल्ह्याला चुकवावी लागली. धान उत्पादक शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी मुख्यमंत्री-वित्तमंत्री यांच्याशी संपर्क साधणार असल्याचंही ते म्हणाले. अमरावतीमध्ये दंगल झाली, पोलिस त्याची चौकशी करतील पण ज्यांच्याकडे देशाची सूत्र आहेत त्यांनी सामाजिक सुसूत्रतेला सुरुंग लावला, असं ते म्हणाले. शरद पवार म्हणाले की, डिझेल-पेट्रोलच्या किंमती वाढल्या तर त्याची झळ कास्तकार-सामान्य लोकांना सहन करावी लागते. शरद पवारांच्या विदर्भ दौऱ्याचा आज तिसरा दिवस आहे. आज उद्योजक आणि नागरिक संवाद कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर ते पक्षातील कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहेत.
त्याग कोणी हे जनतेला माहिती:- नाना पटोलेंचं प्रत्युत्तर.

जे नेते होते ते केव्हाच पक्ष सोडून गेले. काँग्रेस हा कार्यकर्त्यांच्या पक्ष असल्याची परखड टीका प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शरद पवार यांच्यावर केली आहे. शरद पवारांसारखे नेते केव्हाचे काँग्रेस सोडून गेले आता काँग्रेस केवळ कार्यकर्त्यांचा पक्ष राहिला आहे. आजही काँग्रेस पक्षात हायकमांड निर्णय घेत असतात. आमच्या घरात काय सुरु आहे हे आम्हाला माहित आहे दुसऱ्यांना कसे कळणार असं, नाना पटोले यांनी म्हटलं आहे. त्याग कोणी हे जनतेला माहिती आहे, आम्हाला कोणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही अशी टीका नाना पटोले यांनी शरद पवारांवर केली आहे. आपण शरद पवारांच्या वक्तव्याला महत्व देत नसल्याचेही पटोले म्हणाले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने