Top News

लस घेतली नसल्यास दुकानांवर लागणार स्टिकर्स. #Sticker


कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी मनपाचे कठोर पाऊल.
चंद्रपूर:- कोरोनाला हद्दपार करण्यासाठी प्रतिबंधात्मक लस हा एकमेव पर्याय उपलब्ध आहे. त्यामुळे १०० टक्के लसीकरण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी शहरातील विविध भागातील दुकानदार आणि तिथे काम करणार्‍या कामगारांनी लस घेतली नसल्यास संबंधित दुकानांच्या दर्शनी भागात स्टिकर्स चिपकविण्यात येणार आहे.
कोरोनाविरुद्धच्या लढ्यात नागरिकांच्या व्यापक आरोग्य हितासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेने कठोर पाऊल उचलले आहे. फेरीवाले, सेवापुरवठादार यांनी लसीकरण केल्याचे प्रमाणपत्र दाखवावे, अन्यथा बाजारात प्रवेश न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. औद्योगिक वसाहती, उद्योग समूह, खासगी कार्यालय या ठिकाणचे कर्मचारी, कामगारांनी किमान पहिला डोस घेतल्याचा पुरावा दाखविणे बंधनकारक असून, वेगवेगळ्या उद्योग समूहात काम करणाऱ्या कामगारांना कामावर घेताना, मजुरांना काम देताना प्रत्येकाचे दोन डोस झाले आहे, याची खातरजमा करणे गरजेचे आहे. जनतेशी सतत संपर्क येणाऱ्या प्रत्येक सेवापुरवठादार, फेरीवाले, भाजीविक्रेते यांनी लसीकरण करणे बंधनकारक असून, मनपाची चमू गोल बाजार, गंज मार्केट आणि भाजी विक्रीच्या ठिकाणी लसीकरण केल्याचे प्रमाणपत्र तपासणी करणार आहे. त्यामुळे सर्वानी तात्काळ लस घ्यावी, शिवाय प्रमाणपत्र सोबत ठेवावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.
जे दुकानदार आणि कामगार लस घेतलेली नाही, असे तपासणीत आढळून आल्यास त्या दुकानावर स्टिकर्स लावण्यात येणार आहे. "या दुकानात काम करणाऱ्या लोकांनी अजूनही कोविड-१९ प्रतिबंधात्मक लस घेतलेली नाही. ग्राहकांनी याची नोंद घ्यावी व आपल्या जबाबदारीवर प्रवेश करावा", असे या स्टिकर्सच्या माध्यमातून सूचित करण्यात येणार आहे. सदर स्टीकर शासनाची मालमत्ता आहे. मनपातील अधिकृत व्यक्तीच्या परवानगीशिवाय हे स्टीकर काढू नये. अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असेही निर्देश आयुक्त राजेश मोहिते यांनी दिले आहेत.

आरोग्य विभागाने शहरात २१ केंद्रांवर लसीकरणाची सोय उपलब्ध केली आहे. त्यामुळे सर्व पात्र व्यक्तींनी तातडीने लस घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने