गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त. #Gadchiroli

Bhairav Diwase
जे मृतदेह मिळालेत त्यातील काहींची ओळख पटली, तर काहींची ओळख पटवणं सुरू.

ठार झालेल्या नक्षल्यांचे मृतदेह गडचिरोली जिल्हा रुग्णालयात.
गडचिरोली:- राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी गडचिरोली पोलीस आणि सी-६० जवानांच्या पथकांनं नक्षलवाद्यांवर केलेल्या कारवाईबद्दल अभिमान वाटत असल्याचं मत व्यक्त केलं. तसेच या कारवाईसाठी महाराष्ट्र पोलिसांचं कौतुकही केलं. यावेळी त्यांनी नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केल्याचंही नमूद केलं. तसेच कोणती शस्त्रं जप्त केली. याची माहिती दिली.

दिलीप वळसे पाटील म्हणाले, "महाराष्ट्र पोलिसांनी नक्षलवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त केलाय. त्यात एके ४७ च्या ५ रायफल, एके विथ यूबीजीएल अटॅचमेंट एसएलआर ९, इन्सास १, ३०३ च्या ३, १२ बोअरच्या ९ बंदुका, पिस्तुल १ असे एकूण २९ शस्त्रास्त्र जप्त करण्यात आले."
चकमकीनंतर मोहीम सुरू राहणार की बंद होणार?

यावेळी दिलीप वळसे यांनी नक्षलवाद्यांविरोधातील मोहीम सुरूच असल्याचं स्पष्ट केलं. "शोध मोहीम अजूनही सुरूच आहे. जे मृतदेह मिळालेत त्यातील काहींची ओळख पटली आहे, तर काहींची ओळख पटवणं सुरू आहे. या भागातील शोधमोहीम सायंकाळपर्यंत सुरूच राहील," असं दिलीप वळसे यांनी सांगितलं.
"महाराष्ट्र पोलीस कायमच अशा मोठमोठ्या कारवाई करत आलेत. कुणालाही अभिमान वाटावा अशी ही कारवाई आहे. यासाठी मी महाराष्ट्र पोलिसांचं अभिनंदन करतो," असंही त्यांनी नमूद केलं.