वाघ आला रे.... वाघ आला... #Tiger


शासकीय वसतिगृहात शिरला "वाघ."
(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
सिंदेवाही:- शनिवारी (13 नोव्हेंबर) ला सकाळची साडेआठ ते नऊ वाजता मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहाच्या लोखंडी गेट वरून वाघाने आतमध्ये उडी मारून प्रवेश केला. वाघ वसतिगृहाच्या आवारात भ्रमंती सुरू केला. दिवाळीच्या सुट्टीत विद्यार्थी गावाला गेलेले असल्याने वसतिगृहात शुकशुकाट होता. वस्तीगृहात असलेल्य चौकीदाराला वाघाचे दर्शन झाले. आणि एकच तारांबळ उडाली. ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही येथील पाथरी रोडवर असलेल्या मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहातील आहे.
सिंदेवाही येथील तालुक्याचे ठिकाणी पाथरी रोड वर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह आहे. हे अगदी रस्त्याच्या कडेला व शेत शिवाराला लागूनच आहे. शिवाय वस्तीगृहाच्या मागील बाजूस घनदाट जंगल आहे. नेहमीच या परिसरात वाघांचा वावर असतो. जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना सायंकाळच्या सुमारास वाघाचे दर्शन होत असते.
काल शनिवारी अचानक सकाळी साडे आठ ते नऊच्या सुमारास शेतशिवारातून पट्टेदार वाघाने वस्तीगृहाच्या उंच लोखंडी गेट वरून उडी मारून आत मध्ये प्रवेश केला. ऐरवी वसतीगृहात विद्यार्थ्यांची सकाळपासून चहलपहल असते, परंतू दिवाळी निमित्त विद्यार्थी गावाला सुटीवर गेले असल्याने आवारात शुकशुकाट होता. वसतीगृहाच्या आवारात वाघ भ्रमंती करीत होता. वसतीगृहाच्या देखरेखीसाठी एकटाच चौकीदार होता. सकाळी तो उठताच त्याला वाघाचे दर्शन झाले आणि एकच तारांबळ उडाली. वाघ वसतीगृहाच्या आवारात भ्रमंती करीत होता. सैरावैरा आपली शिकार शोधण्याचा प्रयत्न करीत होता. त्याची आक्रमकता पाहूण चौकीदार एका खोलीतच राहिला आणि त्याने लगेच वसतीगृहाचे अधीक्षकाला माहिती दिली. वनविभागालाही माहिती देण्यात आली. वनविभागाची माहिती वसतीगृहात दाखल झाली. बघतात तर काय चक्क वाघ वसतीगृहात वावर करीत आहे. आज विद्यार्थी असते तर एका मोठ्या प्रसंगाला सामोरे जावे लागले असते परंतु दिवाळीच्या सुट्टी असल्याने विद्यार्थी गावात सुखरूप आहेत.
ऐरवी या भागात वाघाचे दर्शन काही नवीन बाब नाही. अधून मधून वाघाच्या हल्याच्या घटनाही घडत असतात. त्यामुळे या परिसरात वाघाच्या दहशतीखालीत दैनंदिन कामे होत आहेत. पण शनिवारी चक्क वाघोबा वसतीगृहापर्यंत येऊन पोहचले. या घटनेमुळे विद्यार्थी ही वाघाच्या दहशतीखालीच या वसतीगृहात राहतील यात शंका नाही. वनविभागाच्या चमूने वसतीगृहातून वाघोबाला मोठ्या शिताफीने जंगलाच्या दिशेने पळवून लावले आणि चोकीदाराने सुटकेचा श्वास घेतला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत