Top News

उलटलेल्या ट्रकमधील चालकाची गावकऱ्यांनी केली सुटका #accident

कुरखेडा:- छत्तीसगढ राज्यातून तेलंगाणाकडे जाणारा ट्रेलर (माेठा ट्रक) शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास खड्ड्यामुळे अनियंत्रित होत रस्त्याच्या कडेला उलटला. चेंदामेंदा झालेल्या केबिनमध्ये चालक रात्रभर अडकून पडला हाेता. तासभरानंतर त्याला बाहेर काढण्यात आले. क्लिनर गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात कूरखेडा-कढोली मार्गावरील घाटी गावाजवळ घडला.
रायपूर येथून माेबाइल टाॅवरचे लोखंडी साहीत्य घेऊन सीजी ०७ बीए २४०५ क्रमांकाचा ट्रेलर तेलंगाणा राज्याकडे जात हाेता. खड्ड्यावरून ट्रेलर उसळत रस्त्याचा कडेला पलटला. अपघात हाेताच घाटी गावातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. क्लीनर हा मागच्या डाल्यात झाेपला हाेता. ताे बाहेर फेकल्या गेला. त्याला गावकऱ्यांनी उचलून दवाखान्यात भरती केले. या अपघातात चालकच्या केबिनचा चेंदामेंदा झाला. केबिन ताेडल्याशिवाय चालकाला बाहेर काढणे शक्य नव्हते. शनिवारी सकाळपासून रेस्कू ऑपरेशन राबवत जेसीबी व गावकऱ्यांच्या मदतीने ट्रेलरची केबिन फोडून दुपारी ११.३० वाजेच्या सुमारास चालकाला बाहेर काढण्यात यश आले.
शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष चांगदेव फाये, भाजप महामंत्री ॲड. उमेश वालदे, माजी नगरसेवक संतोष भट्टड, उल्हास देशमुख, आशिष काळे यांच्यासह घाटी गावकऱ्यांनी चालकाला बाहेर काढण्यास मदत केली. पप्पू पांडे (५०), रा. दुर्ग, छत्तीसगढ असे चालकाचे नाव आहे. क्लीनरचे नाव कळू शकलेले नाही. दोघांनाही उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले.
घाटीवासीय रात्रभर जागले

अपघात झाल्याचे कळताच घाटीवासीयांनी घटनास्थळी धाव घेतली. जेसीबीअभावी किंवा कटरअभावी केबिन ताेडणे शक्य नव्हते. ही बाब गावकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर गावातील काही नागरिकांनी रात्रभर अपघात स्थळीच थांबून केबिनमध्ये सापडलेल्या चालकाला धीर दिला. तसेच सकाळ हाेताच मदतकार्याला सुरुवात करून चालकाला बाहेर काढले. केबिनमधून बाहेर निघताच चालकाने गावकऱ्यांचे आभार मानले. रात्रभर कॅबिनमध्ये अडकून पडलेला चालक १२ तासानंतर कॅबिनबाहेर पडला. तसेच अपघातामुळे ट्रकचा असा चेंदामेंदा झाला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने