जाहिरात... Advertisement... विज्ञापन

चंद्रपुर शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांची पदावरून हकालपट्टी #Chandrapur

चंद्रपूर:- जिल्हाप्रमुख नितीन मत्ते ह्यांच्या कामगिरीवर नाखूष होऊन त्यांना या पदावरून हटविण्यात येणार असल्याचे भाकीत 'ईटीव्ही भारत'ने केले होते. अखेर हे भाकीत तंतोतंत खरे ठरले असून मत्ते ह्यांना ह्या डच्चू देण्यात आला आहे. त्यांच्याजागी प्रभारी जिल्हाप्रमुख म्हणून मुकेश जीवतोडे ह्यांची नियुक्ती प्रभारी जिल्हाप्रमुख म्हणून करण्यात आली आहे. शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'मध्ये हे अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे.
जिल्हाप्रमुख म्हणून नितीन मत्ते ह्यांना चिमूर, वरोरा आणि ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र पक्षाला बळकट करण्यास आणि पक्षवाढीसाठी ते असमर्थ ठरले. जिल्हाप्रमुख म्हणून त्यांची कामगिरीवर असंतोषजनक ठरली. त्यांच्यावर निष्क्रियतेचा ठपका ठेवण्यात आला. तसेच याबाबत त्यांच्या अनेक तक्रारी पक्षश्रेष्ठीपर्यंत पोचल्या होत्या. तसेच काही महिन्यांपूर्वी जुगार अड्ड्यावर झालेल्या मारहाणीचे प्रकरण चांगलेच गाजले. सात लाख रुपये हिसकावून मारहाण केल्याच्या गंभीर आरोपाखाली सेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख मत्ते यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला होता. ह्याच प्रकरणात तुरुंगाची हवा खाण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवली. एरव्ही राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी राजकीय गुन्हे नोंदविले जातात.
मात्र, मत्ते यांच्यावर अशा गंभीर गुन्ह्याची नोंद झाल्यामुळे पक्षश्रेष्ठींकडून याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. ह्याच वेळी त्यांना जिल्हाप्रमुख पदावरून हटविण्यासाठीच्या हालचालींना वेग आला. याबाबतचे भाकीत विश्वसनीय सूत्रांच्या माहितीच्या आधारे ईटीव्ही भारतने 10 नोव्हेंबरच्या बातमीत प्रकाशित केले होते. अखेर हे भाकीत खरे ठरले असून शिवसेनेने अधिकृतपणे ह्यावर शिक्कामोर्तब केला आहे.
शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'मध्ये तसे जाहीर करण्यात आले आहे. सध्या जिल्हाप्रमुख म्हणून प्रभारीपदी मुकेश जीवतोडे ह्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका तोंडावर ही नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी तालुकाप्रमुख असलेले मुकेश जीवतोडे ह्यांच्यावर विश्वास आणि जबाबदारी टाकण्यात आली आहे. ही बाब मत्ते ह्यांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. मुकेश जीवतोडे ह्यांच्या कामगीरीला बघून पुढील कार्यकाळाचा निर्णय घेण्यात येणार आहे अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातुन प्रसिद्ध करण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत