Top News

लॉयड मेटल्‍स प्रकरणी भाजपाची बदनामी करणाऱ्यांच्‍या विरोधात मानहानीचा दावा दाखल करणार:- देवराव भोंगळे #chandrapur


चंद्रपूर:- १९९४ मध्‍ये लॉयड मेटल्‍स हा कारखाना अस्तित्‍वात आला. या कारखान्‍यामुळे भविष्‍यात प्रदुषण होणार आहे याची कल्‍पना कॉग्रेस नेत्‍यांना होती. आज मात्र प्रदुषणाबाबत आंदोलन करत कॉंग्रेस नेते गळे काढत आहे. भारतीय जनता पार्टीने नेहमी स्‍थानिकांना रोजगार मिळावा या धोरणाचा पुरस्‍कार केला आहे असे असताना काही समाजकंटकांनी या मुद्दयाच्‍या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीची अकारण बदनामी सुरू केली आहे. आम्‍ही अशा बदनामीला भिक घालणार नाही. बदनामी करणा-यांवर मानहानीचा दावा दाखल करू, असा ईशारा भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे यांनी दिला आहे.
मनोज कनकम यांनी पोर्टलच्‍या माध्‍यमातुन भाजपा नेत्‍याविरोधात निराधार आरोप केले, त्‍या आरोपांचा समाचार घेताना देवराव भोंगळे यांनी म्‍हटले आहे की, घुग्‍गुस कॉंग्रेसच्‍या अंतर्गत दुफळीतुन निर्माण झालेल्‍या आणि स्‍थानिक लॉयड मेटल्‍स कंपनीच्‍या कोळसा डिओ पर्यंत गेलेल्‍या या दिशाहीन व अर्थहीन प्रकरणावर भाष्‍य करणे निश्‍चीतच संयुक्‍तीक नाही. मात्र या सर्व बाबी जनसामान्‍यांची दिशाभूल करणा-या असून काही दुष्‍प्रवृत्‍तींनी माझ्यावर तसेच माझ्या पक्षावर तथ्‍यहीन आरोप केल्‍यामुळे या आरोपांचे खंडन करणे मला गरजेचे आहे. हे आरोपसत्र घुगगुस नगर परिषदेच्‍या आगामी निवडणूकीच्‍या पार्श्‍वभूमीवर सुरू झाले आहे हे वेगळे सांगण्‍याची गरज नाही. मात्र भारतीय जनता पार्टीने नेहमीच घुग्‍गुस शहराच्‍या विकासासाठी पुढाकार घेतला व या शहराचा चेहरामोहरा बदलविला हे जनतेसमोर उघड आहे. आमच्‍याजवळ विकासाचा मुद्दा आहे मात्र कॉंग्रेसजवळ विकासाचा मुद्दा नाहीच पण उपस्थित करण्‍यासाठी कोणताही मुद्दा नाही. घुग्‍गुस शहरातील आजवरची सर्व विकासकामे भारतीय जनता पार्टीच्‍या माध्‍यमातुन झाली आहे यात प्रामुख्‍याने शहरातील सर्व सिमेंट रस्‍ते, नाल्‍या बांधकाम, तीन पाण्‍याच्‍या टाक्‍या, जलशुध्‍दीकरण केंद्रे, ग्रामीण रूग्‍णालय, १० बगीचे, अनेक ठिकाणी आरो मशीन्‍स, २५० च्‍या वर बोअरींग्ज, घुग्‍गुस शहरात अनेक ठिकाणी हायमास्‍ट लाईट, एलईडी लाईट, वाढीव विद्युत पोल्‍स, सर्वधर्मीय समाजाच्‍या स्‍मशानभूमीचा विकास, धार्मीक स्‍थळांचा विकास, वर्धा नदीवर मोठा पुल, बसस्‍थानक अशी असंख्‍य विकासकामे भाजपाने पुर्णत्‍वास आणली आहे. कॉंग्रेसला अंतर्गत कहलाने पोखरले असल्‍यामुळे कॉंग्रेसच्‍या नेत्‍यांना स्‍मृतीभ्रंश झाल्‍यासारखी परिस्‍थीती आहे.
घुग्‍गुस हे शहर औद्योगिक आहे, प्रदुषणाची समस्‍या तर महत्‍वाची आहेच. परंतु प्रदुषणाच्‍या समस्‍येचे भांडवल करत मलिदा लाटण्‍याचा प्रयत्‍न कॉंग्रेसच्‍या नेत्‍यांचा आहे. परवाच एका कॉंग्रेसच्‍या नेत्‍याने आंदोलन केले. हा प्रकार किळसवाणा आहे. या निमीत्‍ताने प्रश्‍न हा उपस्थित होतो की हे आंदोलन प्रदुषणाच्‍या विरोधात होते की वैयक्‍तीक स्‍वार्थासाठी ? कॉंगेसच्‍या नेत्‍यांना विकासाच्‍या मुद्दयावर बोलता येत नसेल तर त्‍यांनी असे वा-याला लाथा मारण्‍याचे प्रकार तातडीने बंद करावे, अन्‍यथा प्रत्‍त्‍युतरादाखल आम्‍हालाही बोलता येईल. कारण भारतीय जनता पार्टीजवळ विकासाचे ब्रम्‍हास्‍त्र आहे.
लॉयड मेटल्‍स हा कारखाना २५-३० वर्षापासून आहे. अनेक लोक या ठिकाणी काम करतात. स्‍थानिक या नात्‍याने आम्‍ही सुध्‍दा त्‍या ठिकाणी काम करतो. जिल्‍हयातील व जिल्‍हयाबाहेरील मोठी मंडळी सुध्‍दा या कारखान्‍यामध्‍ये विविध कामे करतात. आम्‍ही या ठिकाणी करत असलेली कामे आंदोलन करून किंवा ब्‍लॅकमेलींग करून किंवा आंदोलनाची धमकी देवून मिळविलेली नाही तर ही कामे आम्‍ही गुणवत्‍तेवर मिळविलेली आहेत. आम्‍ही ही कामे कोणत्‍या नावाने करायची हा आमचा विषय आहे. आम्‍ही कायम गुणवत्‍तेची कास धरल्‍याने आम्‍ही उत्‍तमरित्‍या या कामांचे संचालन करीत आहोत. घुग्‍गुस हे औद्योगिक शहर आहे. याठिकाणी वेकोलिच्‍या माईन्‍स, लॉयड मेटल्‍स, ए.सी.सी. कंपनी, गुप्‍ता कोलवॉशरी असे अनेक कारखाने आहेत. याठिकाणी विविध राजकीय पक्षांचे लोक काम करतात. राजकीय क्षेत्रात काम करणा-या व्‍यक्‍ती व्‍यवसायाच्‍या दृष्‍टीने कोणत्‍याही कंपनीत काम करतीलच. त्‍यांनी कोणत्‍याही कंपनीत काम करू नये असा नियम निश्‍चीतच नाही. याशिवाय भाजपाच्‍या माध्‍यमातुन अनेक बेरोजगारांना या सर्व कारखान्‍यांच्‍या आस्‍थापनेवर रोजगार सुध्‍दा मिळवून दिला आहे.
प्रदूषणाबद्दल आम्‍ही अनेकदा व्‍यवस्‍थापनाशी चर्चा केली व व्‍यवस्‍थापनाने उपाययोजना देखील केली. कोळसा डिओ मिळतो म्‍हणून प्रदूषणावर बोलत नाही हा आरोप निखालस खोटा असून आम्‍ही वेळोवेळी प्रदुषणाबाबत व्‍यवस्‍थापनाला अवगत केले आहे. उच्‍चस्‍तरीय जॉंच हा शब्‍द आरोपकर्त्‍यांने सतत वापरला आहे. आम्‍ही प्रामाणिकपणे काम करणारी माणसे आहोत. त्‍यामुळे आम्‍हाला कोणत्‍याही चौकशीची भिती नाही. राज्‍यात कॉंग्रेस पक्षाचे सरकार आहे. काय चौकशी करायची ती करा आम्‍ही कोणत्‍याही चौकशीला सामोरे जायला तयार आहोत. मनोज कनकम हे नेहमीच भारतीय जनता पार्टीच्‍या नेत्‍यांवर निराधार तथ्‍यहीन आरोप सातत्‍याने करीत आले आहेत. ते कॉंग्रेस विचारसरणीचे, कॉंग्रेस धार्जीणे असल्‍याचे सर्वविदित आहे. त्‍यांच्‍या या आरोपसत्राला आम्‍ही आजवर उत्‍तर दिले नाही याचा अर्थ आम्‍हाला बाजू मांडता येत नाही असा निश्‍चीतच नाही. यासंदर्भातील वस्‍तुस्थिती जनतेसमोर यावी यासाठी त्‍यांच्‍या विरोधात आम्‍ही मानहानीचा दावा दाखल करू असा पुनरूच्‍चार देवराव भोंगळे यांनी केला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने