महावितरणपुढे ठिय्या आंदोलन करताना आ. गजबे यांना पोलिसांनी घेतले ताब्यात #gadchiroli

Bhairav Diwase
शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना 24 तास विद्युत पुरवठा चालू करण्यासंदर्भात महावितरणपुढे ठिय्या आंदोलन

भाजप कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
गडचिरोली:- कृषिपंपांना चोवीस तास वीजपुरवठा करावा, या मागणीसाठी आज (सोमवार) आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी देसाईगंज येथील महावितरणच्या उपकार्यकारी अभियंता कार्यालयापुढे भर पावसात ठिय्या आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी आ.गजबे यांना आंदोलनस्थळावरुन ताब्यात घेत काही वेळासाठी स्थानबद्ध केले.
कृषिपंपाना केवळ ८ तास वीजपुरवठा करण्याचे परिपत्रक उर्जा विभागाने काढले आहे. मात्र, सध्या उन्हाळी धानपीक, भाजीपाला लागवड व रबी पिकाचा हंगाम असल्याने पिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. त्या अनुषंगाने कृषिपंपाना चोवीस तास वीजपुरवठा करावा, या मागणीसाठी आज आ.कृष्णा गजबे, भाजपचे जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे तसेच भाजप कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयापुढे ठिय्या आंदोलन सुरु केले.


मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरुच राहील, अशी भूमिका आ. गजबे यांनी घेतल्याने वाहतूक खोळंबली होती. त्यामुळे पोलिसांनी आ.गजबे यांना ताब्यात घेतले. काही वेळानंतर त्यांची सुटका करण्यात आली. दरम्यान, भाजप कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.