Top News

"तो फोटो पाहिला, आदेश दिले.", आदित्य ठाकरे थेट नाशिकमधील त्या आदिवासी पाड्यावर पोहोचले अन्. #Nashik

सोशल मीडियावर आपण एखाद्या खेडेगावातील समस्या सांगणारा फोटो पाहतो आणि हळहळ व्यक्त करतो. मात्र अशाच एका व्हायरल फोटोवरुन महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी थेट सरकारी अधिकाऱ्यांना आणि यंत्रणांना आदेश देत संबंधित गावामधील समस्या दूर तर केल्याच पण ज्या सेवा गावकऱ्यांना उपलब्ध करुन दिल्या त्याच्या उद्घाटनासाठी ते स्वत: हजर झाल्याचं पहायला मिळालं.
मी सोशल मीडियावर या जागेचा फोटो पाहिला होता. त्यानंतर मी अधिकाऱ्यांना या गावातील समस्या सोडवण्यासंदर्भातील निर्देश दिले, असं आदित्य यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. हे निर्देश दिल्यानंतर तीन महिन्यांमध्ये आम्ही या ठिकाणी पूल बांधला आणि गावातील प्रत्येक घरात आता नळाने पाणीपुरवठा केला जातोय, असंही आदित्य यांनी स्पष्ट केलं. लोकांच्या अडचणी सोडवणं हे आमचं काम आहे, असंही आदित्य यावेळी म्हणाले.
आदित्य ठाकरेंच्या हस्ते नाशिकमधील दुर्गम भागात असणाऱ्या शेंद्रीपाडा या आदिवासींची लोकसंख्या अधिक असणाऱ्या गावामधील एका नदीवरील पुलाचं उद्घाटन करण्यात आलं. शेंद्रीपाडा येथील गावकऱ्यांना आतापर्यंत बांबूच्या आधारे बांधलेल्या पूलावरुन जीव मुठीत घेऊन नदी ओलांडावी लागायची. बांबूंवरुन नदी ओलांडत डोक्यावर पाण्याचे हंडे घेऊन जाणाऱ्या महिलांचे फोटो पाहून आदित्य ठाकरेंच्या आदेशानंतर सूत्र फिरली आणि तीन महिन्यात गावातील पूलाची आणि पिण्याच्या पाण्याची समस्या सुटलीय.
गावामध्ये राबवण्यात आलेल्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेचा शुभारंभही आदित्य ठाकरेंच्या हस्ते करण्यात आला. या गावामध्ये आजपर्यंत नळाने पाणी येत नव्हतं. मात्र आता नळाने गावामध्ये पाणीपुरवठा करण्यास सुरुवात झाली आहे. या योजनांचा गावकऱ्यांना कसा लाभ होणार आहे याबद्दलची चर्चाही आदित्य यांनी गावकऱ्यांसोबत केली.
हे समाजामधील असे काही आवाज आहेत जे आपण ऐकले पाहिजे आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण झटलं पाहिजे, असं आदित्य यांनी ट्विटरवरुन म्हटलं आहे. यासाठी आदित्य यांनी स्थानिक नेत्यांबरोबरच पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचेही आभार मानलेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने