Top News

व्वा रे पठ्ठ्या....! #Yavatmal

पोऱ्याने ग्रामसभेत सोडवली बापाची दारू
यवतमाळ:- आर्णी तालुक्यातील लोनबेहळ येथील अवघ्या 13 वर्षीय अंकुश राजू आडे या चिमुकल्याने लोनबेहळ ग्रामपंचायतची ग्रामसभा गाजवली. त्याचे वडील राजू आडे यांनी दारू सोडावी, असे ग्रामसभेत सर्वांसमोर सांगितले. ग्रामसभेने अंकुशचे वडिलांना कान पकडून उठबशा काढायला लावल्या व यापुढे कधीही दारू प्यायची नाही, असे फर्मान बजावले. अंकुशच्या वडिलांनी ग्रामसभेचे आदेश मानून आपल्या लाडक्या मुलाच्या प्रेमापोटी यापुढे दारू पिणार नाही, असे वचन दिले. एका 13 वर्षाच्या मुलाने आपल्या वडिलाची दारू सोडवल्यामुळे त्याचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
लहान बहिणीला डॉक्टर बनवायचे स्वप्न.....

आर्णी ते माहूर चौपदरी महामार्गावर लोनबेहळ हे बंजारा बहुल गाव आहे. येथील जिल्हापरिषद मराठी शाळेत अंकुश सातव्या इयत्तेत शिक्षण घेत आहे. आर्णी येथील भारती विद्यालयात शिकणाऱ्या लहान बहिणीला डॉक्टर बनवायचे स्वप्न अंकुशने उराशी बाळगले आहे. पण, वडील अत्यल्प भूधारक शेतकरी असल्यामुळे घरची आर्थिक स्थिती खूप बेताची आहे. तरीही वडील मोलमजूरी करुन आलेल्या पैशात दारू पितात. त्यामुळे अपत्यांचे पालपोषण करण्याचे भार आईला डोईजड होत असल्याने 13 वर्षीय अंकुशने पैसे कमावण्यासाठी कंबर कसली.
...अन् वडिलाने सोडले दारू पिणे

अंकुश गावात फेरी करून भाजीपाला विकू लागला. भाजी घ्या, अशी आरोळी देतांना वाकचातुर्याने व्यसनमुक्तीचा संदेश गावकऱ्यांना देऊ लागला. दारू पिण्याचे तोटे व मुलांना सुशिक्षित करण्याचे धडे गावकऱ्यांना समजावू लागला. याचीच दखल घेत लोनबेहळ ग्रामपंचायतने ग्रामसभेत अंकुशला बोलावले. तर हा पठ्ठ्या वडिलासोबत ग्रामसभेत पोहोचला. त्याचे वडील राजू आडे यांना दारुचे व्यसन असून ते व्यसन सोडवावा, अशी विनंती त्याने ग्रामसभेत केली. ग्रामसभेने राजू आडे यांना कान धरून पाच उठबशा काढण्याचे व दारू पिणे सोडण्याचे आदेश दिले. राजूने कर्तृत्त्ववान मुलाच्या प्रेमापोटी उठबशा काढून दारू पिणे सोडण्याचे वचन ग्रामसभेत सर्वांसमोर दिले. चिमुकल्या अंकुशच्या समयसुचकतेसाठी सरपंच मोनिका सुनील राठोड, उपसरपंच शरद तिवारी, ग्रामसेवक मनोज सुरजूसे, विस्तार अधिकारी दादाराव चंद्रणारायन यांनी खूप कौतुक केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने