माझा राजा उपाशी असताना मी घरात कसा बसू, छत्रपतींचा मावळा म्हणून इथं आलो

मुंबई:- मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती आज मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषणाला बसले आहेत. संभाजीराजे छत्रपती यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने आंदोलन स्थळी उपस्थित राहिले होते. 
यावेळी त्यांनी "माझा राजा उपाशी असताना घरात कसा बसू", असं म्हटलंय. तर, छत्रपतींच्या वंशजांचं कुटुंब उपाशी आहे, हा काळा दिवस असल्याचं देखील ते म्हणाले. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या इतिहासात ज्यांनी शौर्य आणि पराक्रमानं महाराष्ट्राचं नाव जगाच्या पाठीवर मिळवलं आणि आपल्याला सन्मान जगण्याची संधी दिली ते छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज ज्यांनी आरक्षण ही संकल्पना जगाला सांगितली त्यांचे वंशज आज उपोषणाला बसले आहेत.
 आज मला विचारलं गेलं कोण म्हणून आलाय. मी सांगू इच्छितो की मी इथे खासदार म्हणून नाही तर "छत्रपतींचा मावळा म्हणून आलोय". मी संभाजीराजेंचा हा संघर्ष जवळून पाहिलाय. राजेचं ज्यावेळचं मुंबईला आंदोलन झालं त्यावेळी राजे सर्वत्र चालत जात होते. मी त्यावेळी खासदार नव्हतो. त्यावेळी संभाजीराजे छत्रपतींच्या एका शब्दावर मराठा समाज बांधव एकत्र आले आणि महाराष्ट्र शांत राहिला, ही परिस्थिती होती, असं धैर्यशील माने म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या