गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडा सह सर्व यात्रा रद्द #Canceled

Bhairav Diwase


गडचिरोली:- कोरोना विषाणूचा प्रसार टाळण्यासाठी जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी मार्कंडादेवसह चपराळा, अरततोंडी, वैरागड व अन्य ठिकाणी महाशिवरात्रीनिमित्त भरणाऱ्या यात्रा रद्द करण्याचा आदेश जारी केला आहे. तथापि, ५० लोकांच्या उपस्थितीत संबंधित मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रम पार पाडता येतील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.


शिवाय सद्य:स्थितीत गडचिरोली जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी दिसून येत असली तरी मार्कंडादेवसह अन्य ठिकाणच्या यात्रांमध्ये दरवर्षी होणारी गर्दी बघता कोरोना विषाणूचा प्रादुर्भात वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सर्व यात्रा रद्द करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.
या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था अथवा समुहास साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५, तसेच भारतीय दंड संहिता १८६९ नुसार कारवाई केली जाईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी बजावले आहे.