Top News

रेशनिंगचा तांदूळ, गहू दलालांच्या घशात #saolinews #saoli


गेवरा बुज परिसरात अनेक ठिकाणी दलाल झाले सक्रिय
सावली:- शासन दारिद्र्य रेषेखालील अंत्योदय व केशरी कार्डधारकांना अन्न पुरवठा करते. महिन्याकाठी मिळणारे रेशन आता काही लाभार्थी काळ्या बाजारात विक्री करीत आहेत. अनेक ठिकाणी दलाल सक्रिय झाले असून, रेशनिंगचा गहू, तांदूळ खरेदी करून मोठ्या व्यापाऱ्यांना विकला जात आहे.

काही लाभार्थी तांदूळ तर काही लाभार्थी गहू विक्री करीत आहेत. जिल्ह्यात भात खाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. पोळीशिवाय राहणारे लोक तांदळाचा वापर करून रेशनचे मिळणारे दोन रुपये किलोचे गहू शेजाऱ्या पाजाऱ्यांना ८ ते १० रुपये किलोने विक्री करतात. शासनाने रेशनमध्ये प्रतिव्यक्ती असा रेशनचा कोटा ठरविल्यामुळे जे लाभार्थी तांदळाचा वापर करताना त्यांना रेशन दुकानातून मिळणारे रेशन हे त्यांच्या तुलनेत कमी असते. परंतु गहू मिळत असल्याने गव्हाचा वापर करीत नाहीत.
गव्हाच्या ठिकाणी ते तांदळाचाच वापर करतात. त्यामुळे रेशन दुकानातून मिळालेले २ रुपये किलोचे गहू ८ ते १० रुपये किलोने खुल्या बाजारात विकल्या जातात. याशिवाय ओळखीच्या व्यक्तींनाही त्याची विक्री केली जाते. काही लोक गव्हाचा वापर करतात. परंतु ते तांदूळ दुसऱ्या लोकांना विक्री करतात. तांदूळ १५ रुपये किलोने विकून मिळालेल्या पैशातून गहू खरेदी करतात. अंत्योदय योजनेचा लाभ घेणाऱ्या कार्डधारकांना महिन्याकाठी ३५ किलो रेशन मिळते. २५ किलो तांदूळ व १० किलो गहू मिळत असते. तांदूळ तीन रुपये तर गहू दोन रुपये किलोने रेशन दुकानातून मिळत आहे.
अंत्योदय आणि प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनेअंतर्गत मोफत धान्याचे वाटप केले जाते. स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना धान्याचे बरोबर वितरण होते किवा नाही याची चाचपणी पुरवठा विभागाच्या माध्यमातून केली जात असते. मात्र तक्रार असल्याशिवाय कुणीही कारवाई करू शकत नाही. तसेच रेशनचे धान्य बाहेर लाभार्थी विक्री करीत असल्यासंदर्भात जिल्हा पुरवठा विभागाला तक्रारही प्राप्त होत नाही. यामुळेच रेशनचे धान्य खुल्या बाजारात विकण्याच्या प्रमाणावर अंकुश लागलेला नाही. यातून दलालांचे मात्र चांगभले होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने