Click Here...👇👇👇

राजकीय अभिनिवेश बाजूला सारून एसटी संपावर तोडगा काढा #chandrapur #Mumbai

Bhairav Diwase
आ. सुधीर मुनगंटीवार यांची मुख्यमंत्र्यांकडे सरकारकडे मागणी
मुंबई:- राज्यात गेल्या १५२ दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर महाविकास आघाडी सरकारने पक्षीय राजकारण व राजकीय अभिनिवेश बाजूला सारून, तातडीने सन्मानजनक तोडगा काढावा आणि ग्रामीण भागाच्या जीवन वाहिनीला पुन्हा गती द्यावी अशी मागणी विधिमंडळ लोकलेखा समितीचे अध्यक्ष आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.
२९ ऑक्टोबर २०२१ पासून राज्यात विविध भागात सुरू झालेल्या या संपाने टप्प्याटप्याने गंभीर रूप धारण केले. संपावर तोडगा न निघाल्याने राज्यभरात आतापर्यंत ४५ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली. २८ मार्च रोजी जळगाव जिल्ह्यातील यावल आगाराच्या शिवाजी पाटील या चालकाने रेल्वेखाली येऊन स्वतःचे जीवन संपविले ही घटना हृदय हेलावणारी आहे. हजारो कुटुंब य संपामुळे प्रभावित झाले असून सुमारे ६२ ते ६५ हजार एसटी कर्मचाऱ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. या कर्मचाऱ्यांवर मेस्माअंतर्गत कारवाई, उच्च न्यायालयात अवमान याचिका, कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करणे अश्या प्रकारच्या कारवया राज्य सरकार करीत आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे १८ हजारांवर बसेसची चाके अक्षरशः जमिनीत रुतली आहेत. ज्यामुळे महामंडळाच्या मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. ६५ लाखांवर प्रवाशांना संपाचा फटका बसत आहे. खासगी प्रवासी वाहतूकदार प्रवाशांकडून मनमानी पद्धतीने भाडे वसूल करीत आहेत. नियमित बससेवा नसल्याने ऐन परीक्षेच्या काळात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागत आहे.
खाासगी वाहतुकीदरम्यान झालेल्या अपघातामुळे काही विद्यार्थ्यांचा मृत्यूही झाला आहे. एकूणच महाराष्ट्रातील सर्वसामान्य, गोरगरीब जनता त्यामुळे वेठीस धरली गेली आहे. महाविकास आघाडी सरकारने कोणताही अहंकार आडवा येऊ न देता एसटी कर्मचाऱ्यांचे हित व सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय लक्षात घेता तातडीने या मुद्द्यावर सुवर्णमध्य तोडगा काढावा, अशी मागणी आ. मुनगंटीवार यांनी केली आहे.