मुल येथील कृषी महाविद्यालयाच्या इमारत बांधकामासाठी पहिल्या टप्प्यात ६४.५९ कोटी रू. निधी मंजूर.
(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
मुल:- मुल-मारोडा येथील शासकीय कृषी महाविद्यालयाच्या इमारत बांधकामासाठी पहिल्या टप्प्यात ६४.५९ कोटी रू. किंमतीच्या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. शासनाच्या कृषी व पदूम विभागाच्या दिनांक १६ मार्च २०२२ रोजीच्या शासन निर्णयान्वये सदर कृषी महाविद्यालयाच्या इमारत बांधकामासाठी ६४.५९ कोटी रू. निधी मंजूर करण्यात आला आहे. विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानसभेतील अर्धा तास चर्चेच्या दणक्याचे हे यश आहे.
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या अर्थमंत्री पदाच्या कार्यकाळात दिनांक २८ फेब्रुवारी २०१९ रोजीच्या शासन निर्णयान्वये मुल-मारोडा येथे शासकीय कृषी महाविद्यालय मंजूर करण्यात आले. या महाविद्यालयाच्या इमारत बांधकामासाठी महाराष्ट्र कृषी संशोधन परिषद पुणे यांच्यामार्फत रू.१३३.३५ कोटींचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाची छाननी करून ६४.५९ कोटीच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
*विधानसभेत संसदीय आयुधाचा दणका व मिळालेले यश*
सदर कृषी महाविद्यालयाच्या इमारत बांधकामासाठी निधी उपलब्ध करावा यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी शासनाशी सातत्याने पत्रव्यवहार व पाठपुरावा केला. मात्र शासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने आ. मुनगंटीवार यांनी १० मार्च २०२२ रोजी याबाबत अर्धा तास चर्चा उपस्थित करत कृषीमंत्र्यांना धारेवर धरले. इमारत बांधकामासाठी त्वरीत निधी मंजूर करावा अशी आग्रही मागणी करत हे कृषी महाविद्यालय इतरत्र हलविण्याचा प्रयत्न करू नये असा सज्जड दम आ. मुनगंटीवार यांनी शासनाला दिला. माजी मुख्यमंत्री कर्मवीर मा. सा. कन्नमवार यांच्या भूमीतील या कृषी महाविद्यालयासाठी तातडीने निधी मंजूर करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.
या चर्चेला उत्तर देताना कृषीमंत्री दादा भुसे यांनी इमारत बांधकामासाठी त्वरीत निधी मंजूर करण्याचे आश्वासन देत महाविद्यालय इतरत्र नेणार नसल्याची ग्वाही सभागृहाला दिली.
आ. मुनगंटीवार यांच्या संसदीय आधुधाच्या दणक्याने सहाव्या दिवशी सदर कृषी महाविद्यालयाच्या इमारत बांधकामासाठी निधी मंजूर करण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला.राज्यात सत्तेत असो वा नसो जिद्द व परिश्रमाच्या जोरावर विकासकामांसाठी निधी खेचुन आणता येतो याचा प्रत्यय आ. मुनगंटीवार यांनी यानिमीत्ताने दिला.