१६ आत्मसमर्पित नक्षलवाद्यांसह ११७ आदिवासी जोडपी विवाहबद्ध
गडचिरोली:- रविवारी संपूर्ण शहर सनई चौघड्यांची दुमदुमून गेले. निमित्त होते मैत्री परिवार संस्था नागपूर आणि गडचिरोली पोलिस दलाच्या पोलिस दादालोरा खिडकी यांच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली येथे १६ आत्मसमर्पित नक्षलवाद्यांसह ११७ आदिवासी जोडप्यांच्या सामूहिक विवाह सोहळ्याचे.
रविवारी (ता. १३) हा सामूहिक विवाह सोहळा स्थानिक गडचिरोली-चंद्रपूर मार्गावर असलेल्या अभिनव लॉन येथे सकाळी १० वाजता पारंपरिक आदिवासी संस्कृतीनुसार थाटामाटात पार पडला. कार्यक्रमाला आमदार डॉ. देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार, भाजपचे संघटनमंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, श्री गुरुदेव सेवा मंडळाचे जिल्हा सेवाधिकारी डॉ. शिवनाथ कुंभारे, पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलिस अधिकारी (प्रशासन) समीर शेख, अपर पोलिस अधिकारी (अभियान) सोमय मुंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रणील गिल्डा, मैत्री परिवार संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य संजय भेंडे, सचिव प्रमोद पेंडके, संस्थेच्या गडचिरोली शाखेचे अध्यक्ष निरंजन वासेकर, पंडित पुडके, माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे घिसुलाल काबरा, सुनील चिलेकर आदींची उपस्थिती होती.
जिल्ह्यातील धानोरा, गडचिरोली, कोरची, कुरखेडा, पेंढरी, अहेरी, एटापल्ली, हेडरी, भामरागड, जिमलगट्टा अशा दहा झोनमधून जोडप्यांची निवड करण्यात आली होती. रविवारी सकाळी ७ वाजता वधूवरांसह भव्य मिरवणूक काढण्यात आली. या सोहळ्याला मुंबई, पुणे, नागपूर येथील मैत्री परिवाराचे सदस्य उपस्थित होते. यावेळी मैत्री परिवार संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य भेंडे, पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी मार्गदर्शन केले.
पोलिसांनीही घेतला नृत्याचा आनंद
सकाळी विवाह सोहळ्यासाठी आलेल्या वरवधूंची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी वाजणाऱ्या डीजेच्या गीतांवर वऱ्हाडी मंडळींसह कार्यक्रमाच्या नियोजनात व बंदोबस्तात असलेले पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही नृत्याचा ठेका धरला.