Top News

खासदार भावना गवळी हरविल्या, भाजपची पोलिसांत तक्रार #police #MP

नागपूर:- कालपासून शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान विदर्भ आणि मराठवाड्यात सुरू झाले. सेनेचे खासदार विदर्भातील सर्व जिल्ह्यांत विखुरले आणि पक्ष संघटन मजबूत करण्याचे काम त्यांनी सुरूही केले. पण या अभियानात यवतमाळ-वाशीमच्या खासदार भावना गवळी कुठेही दिसल्या नाहीत. भारतीय जनता पक्षाने नेमकी हीच संधी साधत खासदार भावना गवळी हरविल्याची तक्रार पोलिसांत दिली आहे.
येवढ्यावरच भाजपचे कार्यकर्ते थांबले नाहीत, तर त्यांनी शहरातील पोलिस अधीक्षक चौकात 'आमच्या खासदार ताई हरविल्या आहेत, खासदार दाखवा बक्षीस मिळवा', अशा मजकुराचे होर्डींग्ज लावले. पण शिवसैनिकांनr त्यांना प्रत्युत्तर देत ते होर्डींग्ज काढून टाकले. दरम्यान भाजपच्या महिला सेलच्या पदाधिकारी माया शेरे यांनी पोलिस ठाण्यात खासदार हरविल्याची तक्रार नोंदविली. गेले कित्येक महिने चर्चेत नसलेल्या खासदार भावना गवळी काल शिवसंपर्क अभियान सुरू झाल्यापासून अचानक चर्चेत आल्या. शिवसंपर्क अभियानासाठी विदर्भात आलेल्या सेनेच्या खासदारांना 'खासदार भावना गवळी अभियानात का नाहीत', या प्रश्‍नाचे उत्तर देत फिरावे लागत आहे.
आमच्या मतदारसंघातील खासदार भावना गवळी मागील सहा महिन्यांपासून मतदारसंघात आलेल्या नाहीत. त्यामुळे मतदारसंघातील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना सामान्य नागरिकांना करावा लागत असल्याची लेखी तक्रार माया शेरे यांनी दिली आहे. काल रात्री दरम्यान भाजपने जिल्हा पोलीस अधीक्षक चौकात खासदार हरविल्याचे होर्डींग्च लावले होते. त्यानंतर काही वेळात ते होर्डींग्ज शिवसैनिकांनी हटविले. आता भाजपच्या महिला पदाधिकारी माया शेरे यांनी चक्क खासदार हरविल्याची तक्रार पोलिसात दिली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना रंगला आहे.
या अभियानामुळे विदर्भातील शिवसेनेमध्ये नवचैतन्य संचारल्याचे दिसत आहे. तीन दिवस सेनेचे सर्व खासदार त्यांना जबाबदारी दिलेल्या जिल्ह्यांमध्ये तळ ठोकून असणार आहेत. या काळात ते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. कालपासूनच विदर्भात या अभियानाची चर्चा सुरू होती. पण खासदार भावना गवळी या अभियानात कुठेच दिसल्या नाहीत आणि कुठल्याही जिल्ह्याच्या अभियानप्रमुख म्हणून त्यांचे नावही पुढे आले नाही. त्यामुळे शिवसैनिकांसह राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने