Top News

मोबाईल चार्जिंग लावून बायकोशी बोलताना लागला करंट #shock #Mumbai

तरुणाचा एका झटक्यात मृत्यू
मुंबई:- मोबाईल फोन वापरताना खास काळजी घेणं गरजेचं आहे. शेवटी ते इलेक्ट्रिक उपकरण आहे, त्यामुळे त्याचा वापर करताना छोटासा हलगर्जीपणाही जीवावर बेतू शकतो. अशीच एक दुर्घटना समोर आली आहे. ज्यात एक तरुण मोबाईलवर बायकोशी बोलत होता, त्यावेळी त्याला करंट लागला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला आहे. 25 वर्षांचा मुंबईत राहणारा सुजीत विश्वकर्मा. फर्निचरच्या कामासाठी तो मध्य प्रदेशच्या इंदौरमध्ये गेला होता.
दुसऱ्या दिवशी तो तिथून मुंबईला परतणार होता. त्याआधी रात्रीच त्याला मृत्यूने गाठलं. बायकोशी फोनवर बोलताना त्याला करंट लागला आणि त्याचा मृत्यू झाला. इंदौरच्या विक्रम हाइट्समध्ये ही घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुजीतचं लग्न चार वर्षांपूर्वी झालं होतं. हे कुटुंब मूळचं उत्तर प्रदेशातील आहे. पण मुंबईच्या नालासोपाऱ्यात राहतं. इंदौरमध्ये त्याचं काम संध्याकाळी पूर्ण झालं होतं आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच तो मुंबईला जाणार होता.
पण उशिर झाल्याने इंदौरमध्येच थांबावं लागलं. जेवल्यानंतर सुजीत मोबाईलवर पत्नीशी बोलत होता. त्याचवेळी ही दुर्घटना घडली. मृताचा भाऊ संजयने सांगितलं की तो आठवडाभरापूर्वी इंदौरच्या शोरूममध्ये फर्निचरच्या कामासाठी तो इथं आला होता.
रात्री सुजीतने माझ्याकडून मोबाईलचा चार्जर मागितला. त्यानंतर तो दुसऱ्या खोलीत गेला. इलेक्ट्रिक बोर्डमध्ये मोबाईल चार्जिंगला लावून तो फोनवर पत्नीशी बोलत होता. त्याचवेळी त्याचा किंचाळण्याचा आवाज आला. जेव्हा मी खोलीत जाऊन पाहिलं तर तो बेशुद्ध पडला होता. अमर उजालाच्या रिपोर्टनुसार चार्जिंग लावून मोबाईलवर बोलत असताना त्याला करंट लागला आणि त्यामुळे त्याच्या मेंदूच्या नसा फाटल्या, त्यामुळेच त्याचा मृत्यू झाला असं सांगितलं जातं आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने