दगड, तलवार देण्याऐवजी मुलांच्या हातांना रोजगार द्या #Chandrapur

सत्तावीस समाज संघटनांचा एल्गार

चंद्रपूर:- कोरोनाच्या दोन वर्षांच्या काळात जगात हाहाकार माजला होता. अद्याप कोरोनाचे संकट गेले नाही. लाखो लोकांचे रोजगार बुडाले. कोट्यावधी छोटे-मोठे उद्योग बंद पडले. आता कुठे पूर्वपदावर येण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. महागाई, इंधनाचे दर गगनाला भिडले आहे. सर्वसामान्य लोकांचे जगणे मुश्किल झाले आहे. त्या काळात राज्यकर्त्यांनी लोकांना धीर देणे अपेक्षित होते. सत्ताधारी असो की विरोधक लोकांच्या प्रश्नाकडे, समस्याकडे लक्ष देईल, अशी अपेक्षा होती. परंतु सध्याचे राज्यातील आणि देशातील चित्र बघितले तर पदरी निराशाच पडते लोकांच्या जीवनाशी निगडीत नसलेल्या मुद्द्यावर धिंगाणा सुरू आहे. धार्मिक तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे भविष्यात दंगली पेटतील या सर्वसामान्य कुटुंबातील घरे जळतील. त्यांचीच मुले उद्ध्वस्त होतील. त्यामुळे आम्ही समाज संघटना आणि मतदार म्हणून सर्वपक्षीय नेत्यांना आव्हान करतो,कि हा जीवघेणा खेळ थांबल, आमच्या मुलांच्या हातात दगड, तलवारी देण्याएवजी रोजगार द्यावा अशी मागणी चंद्रपूर जिल्ह्यातील अठरापगड जातींच्या संघटनांनी राज्याचे मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते यांच्यासह प्रमुख पक्षांच्या नेत्यांकडे केली. यांसदर्भात या समाज संघटनांच्या प्रतिनिधींनी आज शनिवारला चंद्रपुरात आयोजित पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली.
आमचा कोणत्या धर्माला, जातीला विरोध नाही. प्रत्येकाला आपल्या धर्माची उपासना करण्याचा अधिकार संविधानानेच दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, फुले-शाहू-आंबेडकरांनी बहुजन समाजाच्या प्रगतीसाठी आपल्या आयुष्यात झिजविले. त्यामुळे आज आमच्या बहुजन समाज प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. तर दुसरीकडे धार्मिक दंगली आणि तेढ निर्माण करण्याचा आमच्या समाजातील तरुण मुलांचा वापर केला जातो. आजवरच्या अनेक दंगलीत हिच वस्तुस्थिती समोर आली आहे. आमच्या मुलांचा अशा पद्धतीने होणारा वापर चिंतेची बाब आहे. मात्र, यापुढे आम्ही बहुजन समाजातील मुलांचा वापर होऊ देणार नाही. आमचा कोणत्याही राजकीय पक्षाला कुठलाही विरोध नाही. प्रत्येकाला आपला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. आज आमच्या समाजातील मुले सर्व पक्षात आहे. त्यांनी प्रगती करावी, योग्य सभागृहात लोकांचे प्रश्न मांडावेत, लोकांच्या मुलभूत प्रश्नासाठी लढावे. मात्र, धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. त्यामुळे त्यांचे वैयक्तिक नुकसान होईल. समाज आणि देशालाही याचा भुर्दंड सोसावा लागेल. धार्मिक तेढ निर्माण केल्याच्या आरोपाखाली आमचीच मुले तुरुंगात कचेरी आणि न्यायालयाचे उंबरठे झिजवावे लागतात. यात त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होते. कुटुंबालाही मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे आम्ही बहुजन समाजातील विविध संघटना आमच्या मुलांना अशा असामाजिक कार्यात सामील न होण्याचे यानिमित्ताने आव्हान करत आहोत.
आज समाजातील तरुणांच्या वेगळ्या समस्या आहेत. शिक्षण, आरोग्य, रोजगार, महागाई या खऱ्या समस्या आहेत. त्या दूर करण्याची आज खरी गरज आहे. त्यावर कोणी बोलायला तयार नाही आम्ही मतदार याच साठीच केले होते काय, असा प्रश्न समाज संघटना आम्हाला पडत आहे. राजकिय प्रक्रियेत लोकांचे कल्याण महत्त्वाचे असते. लोकांच्या मूलभूत प्रश्‍न सोडविण्याचे आश्वासन देऊन राजकीय पक्ष विकास कामांवर मते मांडतात. मात्र एकदा निवडून आल्यावर ते लोकांच्या जीवनाशी निगडित नसलेले मुद्दे उकरून काढतात, असा अनुभव आम्हाला येत आहे. आम्ही अठरापगड जातीच्या संघटना म्हणून समाजातील युवकांना आवाहन करतो. धार्मिक उन्मादात तुम्ही सामिल होवू नका. आपल्या पक्षावर, नेत्यांवर प्रेम करा परंतु त्यांनी सांगितले म्हणून आपल्या घरादाराची रांगोळी होईल, असे कोणतेही कृत्य करू नका. अशी विनंती या प्रतिनिधींनी यावेळी केली. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जलसंपदा मंत्री जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या संघटनांकडून निवेदन पाठविला जाणार आहे. पत्रपरिषदेला डॉ. राकेश गावतुरे, डॉ. सचिन भेदे, डॉ. राजू तोटेवार, आनंदराव अंगलावर, विजय मुसळे, अर्जुन आवारी, अविनाश आंबेकर, ॲड. प्रशांत सोनुले, राजु सिडाम, विकास शेंडे यांच्यासह संघटनांच्या प्रतिनिधींची उपस्थिती होती.
या समाज संघटनांचा पाठींबा कुणबी समाज मंडळ, अखिल भारतीय माळी महासंघ, तैलिक महासंघ, अखिल महाराष्ट्र कुंभार समाज, बेलदार समाज, व्हीजेएनटी वेलफेअर असोसिएशन, गाडी लोहार समाज, भोई समाज, गांडली समाज, आदिवास समाज, भारतीय बौद्ध महासभा, महाराष्ट्र प्रदेश गोलाकर समजा, नाभिक समाज, फ्रान्सिस ख्रिस्ती समाज, गोवारी समाज, अखिल भारतीय मातंग समाज, भाट समाज, सुतार समाज, मातंग समाज, आदिवासी माना समाज, विदर्भ बारई समाज, झाडे कुणबी समाज, भावसार समाज, धोबी समाज, शिंपी समाज, कलार समाज या संघटनांनी या निवेदनाद्वर स्वाक्षरी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत