विद्युत जोडणी करीता डिमांड भरणा-यांना कंपनीकडून मीटर द्या #bhadravati

Bhairav Diwase
भाजयुमोचे जिल्हा महामंत्री इम्रान खान यांची मागणी
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- विद्युत जोडणी करीता ज्या ग्राहकांनी रीतसर डिमांड भरली आहे, त्यांना विद्युत वितरण कंपनीकडून मीटर देण्यात यावे अशी मागणी भाजयुमोचे जिल्हा महामंत्री इम्रान खान यांनी केली आहे.
नवीन विद्युत कनेक्शनसाठी भद्रावती शहरातील नागरिकांनी अर्ज करुन डिमांडही भरली. त्यासाठी त्यांना जवळपास ३२०० रुपये खर्च आला. मात्र बरेच दिवस लोटुनही त्यांना विद्युत वितरण कंपनीकडून अद्याप मीटर देण्यात आले नाही. मागील फेब्रुवारी महिन्यापासून संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात ही समस्या निर्माण झाली असल्याचे समजते. याबाबत नागरिकांनी मीटरची मागणी केली असता तुम्ही परस्पर घ्या असे सांगण्यात येते. मीटर परस्पर घ्यायचे तर डिमांड कशाला घेता असा सवालही नागरिकांनी उपस्थित केला आहे.
नागरिकांची मागणी ही रास्त असून त्यांना त्वरित मीटर उपलब्ध करुन देण्यात यावे. बाजारातून परस्पर मीटर विकत घेतल्यास नागरिकांना ३५०० रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागतो. सामान्य नागरिक हे कोरोनामुळे निर्माण झालेल्या बिकट आर्थिक परिस्थितीतून कसेबसे जेमतेम सावरत आहेत. तरीदेखील त्यांना परस्पर विद्युत मीटर कसे काय घ्यायला सांगितले जाते असा सवाल उपस्थित करत नागरिकांना त्वरित विद्युत वितरण कंपनीने मीटर उपलब्ध करून द्यावे अन्यथा भाजयुमो तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजयुमोचे जिल्हा महामंत्री इम्रान खान यांनी दिला आहे.