विवेकानंद महाविद्यालयात नेट-सेट परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा #Bhadravti(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- स्थानिक विवेकानंद महाविद्यालयातील इतिहास विषयात मास्टर डिग्रीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठ आणि महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक होण्यासाठी आवश्यक असलेली पात्रता म्हणजे नेट आणि सेट या परीक्षेची बारीक-सारीक अशी इतंभुत माहिती होऊन सदर परीक्षेविषयी विद्यार्थ्यांच्या मनात गोडी आणि रुची निर्माण होऊन ही परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी नेमकी आणि नियोजनबद्ध तयारी कशी करावी? जेणेकरून ही पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यास, विद्यार्थ्यांचा मार्ग अधिक सोपा आणि सुकर व्हावा हा उद्देश ठेवून सदर महाविद्यालयाच्या इतिहास विभागातर्फे नेट-सेट परीक्षा विषयी मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी विदर्भ कॉलेज ऑफ आर्ट, कॉमर्स अँड सायन्स, जिवती या महाविद्यालयातील इतिहास विभागप्रमुख डॉ. श्रीकांत पानघाटे यांनी या कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक या नात्याने उपस्थित विद्यार्थ्यांसमक्ष या परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम यावर सविस्तरपणे प्रकाश टाकला. सोबतच त्यांनी नेट आणि सेट या परीक्षेतील विविध बाबींवर सखोल भाष्य केले. ते त्यांच्या मार्गदर्शनपर व्याख्यानात म्हणाले की, "नियोजन, निर्धार, निश्चय, सातत्य शिस्त, स्वारस्य आणि परिश्रम या बाबींचा योग्य समन्वय साधून नेट आणि सेट परीक्षेची पद्धतशीर तयारी केली तर नेट-सेट ही महत्त्वपूर्ण परीक्षा उत्तीर्ण होण्यास विद्यार्थ्यांना फारसे कठीण जाणार नाही".
या कार्यशाळेत इतिहासाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या मनात असणाऱ्या शंका आणि प्रश्न मुख्य मार्गदर्शक यांच्यापुढे अभिव्यक्त केल्या. या अनुषंगाने सर्व विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे निरसन डॉ. श्रीकांत पानघाटे यांच्याकडून विस्तृतपणे करण्यात आले. या कार्यशाळेचे अध्यक्षीय भाषण करताना इंग्रजी विभागप्रमुख प्रा. मोहित सावे यांनी, " या कार्यशाळेतील मार्गदर्शनाचा लाभ घेऊन इथे उपस्थित असणारा इतिहासाचा विद्यार्थी हा येणाऱ्या काळात नक्कीच नेट-सेट परीक्षा उत्तीर्ण करेल" असा आशावाद व्यक्त केला. या कार्यशाळेचे् संचालन इतिहास विभागप्रमुख प्रा. डॉ. जयवंत काकडे, आभारप्रदर्शन डॉ.यशवंत घुमे यांनी केले. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत