ट्रक, दुचाकीच्या धडकेत एक ठार, एक जखमी #accident

Bhairav Diwase
चामोर्शी:- चामोर्शी तालुक्यातील अड्याळ येथे दुचाकीस्वारांचे नियंत्रण सुटल्याने विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकच्या मागच्या चाकात येऊन एका युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवार (ता. ३१) सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली. यात रोहीत कालीदास मडावी (वय २०) रा. येनापूर या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर बालाजी सांतलवार हा जखमी असून त्याच्यावर येनापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे.
प्राप्त माहितीनुसार, गिट्टी भरून एमएच ४० वाय १४९५ या क्रमांकाचा ट्रक चामोर्शीकडून आष्टीकडे जात होता, तर रोहित व बालाजी हे एमएच ३३ पीपी ४८२८ या क्रमांकाच्या दुचाकीने विरुद्ध दिशेने येत होते. अड्याळ बसस्थानकाजवळ दुचाकीस्वाराचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रकला जोरदार धडक बसली व ट्रकचे चाक रोहितच्या अंगावरून गेल्याने यात त्याचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकी चालक जखमी झाला असून तो येनापूर येथील रुग्णालयात उपचार घेत आहे.
घटनेची माहिती मिळताच आष्टी पोलिस घटनास्थळी दाखल झाले व ट्रकचालकाला अटक केली आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी आष्टी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले असून घटनेचा पुढील तपास आष्टी पोलिस करीत आहेत.