विहीरगावात पकडले २० लाखांचे सागवान #arrested #gadchiroli #Aarmori

Bhairav Diwase
0
आरमोरी:- वनविभागाकडून कुठलीही परवानगी न घेता कंत्राटदारामार्फत शेतकऱ्यांच्या शेतातील सागवान अवैधरीत्या कापून लपवून ठेवलेले सागवान वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी विहीरगाव येथे छापा टाकून पकडले. या कारवाईत २० ते २५ लाखांचे सागवान लठ्ठे जप्त केले.
शुक्रवारी दुपारी सुरू झालेली ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरूच होती. वडसा वनविभागातील अलीकडच्या काही वर्षांतील ही सर्वांत मोठी कारवाई ठरली आहे.
आरमोरी वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या आरमोरी तालुक्यातील विहीरगाव येथे शेतातील सागाच्या झाडांची कंत्राटदारामार्फत कापणी करून ते तलावाजवळ लपवून ठेवल्याची गोपनीय माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती.
त्यानुसार वडसा वनविभागाचे सहायक वनसंरक्षक धनंजय वायभासे (भावसे) यांच्या नेतृत्वाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश मेश्राम आणि वन कर्मचाऱ्यांच्या पथकाने विहीरगाव येथे धाड टाकली.
या प्रकरणी लाखनी येथील कंत्राटदार, त्याचे पाच मजूर व चार शेतकऱ्यांवर भारतीय वन अधिनियम १९२७ व महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियम १९६४ नुसार कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. सदर कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
या कारवाईत वन अधिकाऱ्यांना क्षेत्र सहायक सोनुले, राजेंद्र कुंभारे, एम. गाजी शेख, वनरक्षक कमलेश गिन्नलवार, जनबंधू यांनी सहकार्य केले.
६२ मोठ्या वृक्षांची झाली कटाई
सदर शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी करून चौकशी केली असता चार शेतकऱ्यांच्या शेतातील सागाच्या ६२ मोठ्या वृक्षांची कटाई झाल्याचे निदर्शनास आले. शेतात कापलेल्या सागाचे खुंट दिसत होते, मात्र झाडांचे लठ्ठे कापणी केलेल्या ठिकाणी नव्हते. त्यामुळे वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शोधमोहीम राबविली असता विहीरगावाजवळील तलावाच्या पाळीवर १४५ लठ्ठे लपवून ठेवल्याचे दिसले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा करून ते जप्त केले.
शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील झाडांची कापणी करायची असल्यास वनविभागाची रीतसर परवानगी घ्यावी. परवानगी न घेता कोणत्याही शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील कुठल्याही झाडाची कापणी करू नये.
धनंजय वायभासे
सहायक वनसंरक्षक, वडसा वनविभाग

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)