भद्रावती:- येथील योगा कार्यकर्त्या व निसर्गोपचार तज्ञ डॉ. पूजा ऊर्फ ज्योती देवराव देऊरकर यांनी महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करीत पश्चिम बंगाल मध्ये नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय योगासन स्पर्धेत पंचवीस ते पस्तीस वर्षे वयोगटातून देशात प्रथम क्रमांक पटकविला असून नुकताच त्यांचा सत्कार करण्यात आला.
सात गटात पार पडलेल्या सदर स्पर्धेत प्रत्येक राज्यातील स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग होता. महाराष्ट्रातून पंचवीस ते पस्तीस वर्षे वयोगटातून एकूण सहा स्पर्धक सहभागी झाले. यामध्ये भद्रावतीच्या डॉ.पूजा उर्फ ज्योती देऊरकर यांनी इतर पाच स्पर्धकांसह राज्याचे प्रतिनिधित्व केले.
योगासनाचे उत्कृष्ठ प्रदर्शन करीत डॉ.पूजा उर्फ ज्योती देऊरकर यांनी राष्ट्रीय योगासन स्पर्धेत देशात सर्वप्रथम स्थान संपादित केले. राष्ट्रीय योगा उस्ताद कमेटीचे अध्यक्ष आमदार बिपलाबरॉय चौधरी यांच्या शुभहस्ते डॉ. देऊरकर यांना स्मृतीचिन्ह, सन्मानपदक व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
अलिकडेच २६ ते २८ मे २०२२ दरम्यान पश्चीम बंगाल राज्यातील मदिनिपूर जिल्ह्यातील कोलाघाट येथे पुरबा मदिनिपूर जिल्हा योगा असोशिएशन व योगा फिजीक फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने सदर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. ८ ते १३ , १३ ते १८, १८ ते २५, २५ ते ३५, ३५ ते ५० व ५० ते अमर्याद वयोगटासह दिव्यांगासाठी अश्या एकूण सात गटात ही स्पर्धा पार पडली. प्रत्येक वयोगटात प्रत्येक राज्यासह केंद्रशासित प्रदेशातून सहा स्पर्धक सहभागी झाले.
डॉ. देऊरकर यांनी यापूर्वी सुध्दा अनेक स्पर्धात सहभाग घेवून ऐतिहासिक भद्रावती नगरीसह , आपले राज्य व देशाला नावलौकिक प्राप्त करून दिला. याबद्दल स्थानिक योगा परीवाराच्या वतीने डॉ. पुजा देऊरकर यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.