Top News

भाजप वेट अँड वॉचच्या भुमिकेत:- आ. सुधीर मुनगंटीवार #chandrapur #Mumbai


मुंबई:- शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे बंडखोर नाहीत. ते खरे चोवीस कॅरेट शिवसैनिक आहेत आणि तेच शिवसेनेचे गटनेते आहेत. त्यांच्याकडून सत्तास्थानेबाबत अजून कोणताही प्रस्ताव आलेला नाही. तो प्रस्ताव आल्यानंतर आम्ही आमचा निर्णय घेऊ, असे सांगत भाजप अजूनही वेट अँड वॉच च्या भूमिकेत आहे, असे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.
राज्यात निर्माण झालेल्या राजकीय पेच प्रसंगावर चर्चा करण्यासाठी प्रदेश भाजपच्या कोअर टीमची बैठक विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी झाली. या बैठकीला फडणवीस यांच्यासह प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, मंगलप्रभात लोढा, पंकजा मुंडे आदी उपस्थित होते.
पुढच्या दिवसांत ज्या काही घडामोडी घडतील त्यांच्यावर आमची नजर असणार असून कोअर कमिटीच्या बैठकीत त्या संदर्भात वेळोवेळी उचित निर्णय घेण्यात येईल असेही या बैठकीनंतर सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. विश्वासदर्शक ठरावाची मागणी करायची आज तरी गरज वाटत नसल्याचेही ते म्हणाले.
राज्यातील राजकीय घडामोडींबाबत गेले काही दिवस भाजपाने कोणतीही उघड भूमिका घेतलेली नाही. हा शिवसेना तसेच आघाडीतील अंतर्गत प्रश्न असल्याचेच भाजपा नेते उघडपणे बोलत होते. मात्र सोमवारी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर भाजपही सक्रिय झाली आहे. या बैठकीत राज्यातील राजकीय परिस्थितीवर तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
शिवसेनेतील दोन तृतीयांश आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. आम्ही एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांना बंडखोर मानतच नाही. शिवसेनेच्या हिंदुत्वाचा विचारच ते पुढे घेऊन चालले आहेत. ते चोवीस कॅरेट खरे शिवसैनिक आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून आम्हाला अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नाही. पुढच्या दिवसांत जर कोणते प्रस्ताव आले तर आम्ही त्यावर विचार करू. असे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने