Top News

शिरना नाल्यावरील पुलाला पडले मोठे भगदाड, वाहतूक ठप्प #Bhadrawati


भद्रावती:- सततच्या मुसळधार पावसामुळे आणि वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे तालुक्यातील जनजिवन विस्कळीत झाले असून शिरना नाल्यावरील पुलाला भले मोठे भगदाड पडल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.
चारगाव एकता नगर वसाहत ते माजरी या रस्त्यावर शिरना नाला आहे. या नाल्यावरील पुलाला दि. १९ जुलै रोजी पहाटे ४ वाजता भले मोठे भगदाड पडले. पुलाच्या एका बाजुला भेग पडली. तसेच तेथे अंडर कट झाला. त्यामुळे तेथे लावलेल्या संरक्षित पिशव्या वाहून गेल्या.
या पुलावरून वेकोलिचे चारगाव एकता नगर वसाहत आणि भद्रावती येथील जवळपास ३५० ते ४०० कर्मचारी तीन पाळ्यांमध्ये ये-जा करतात. माजरी क्षेत्रातील माजरी ओसीएम आणि टु-जी ओसी या दोन कोळसा खदानीत या कर्मचाऱ्यांना कर्तव्य बजाविण्यासाठी जावे लागते.दरम्यान, पुलाला भगदाड पडताच इंटक नेते धनंजय गुंडावार, दिलीप पारखी, सुरक्षा अधिकारी प्रफुल्ल निकोडे, सकाराव शिंदे, सुरक्षा रक्षक निलेश बिपटे, आकाश कांबळे यांनी घटनास्थळी उपस्थित राहून या रस्त्याने ये-जा करणाऱ्यांना सतर्क केले.
    दरम्यान, आता या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद असून पाणी कमी झाल्यानंतर पुल दुरुस्त करण्यात येईल व वाहतूक सुरळीत होईल अशी माहिती आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने