१० वर्षीय मुलाचा गाल छिन्नविछिन्न
ब्रम्हपुरी:- वाढदिवसाच्या निमित्ताने केकवर लावलेली फवारे उडविणारी मेणबत्ती १० वर्षीय बालक हातात पकडून असताना तिचा अचानक स्फोट झाला. त्यात त्या बालकाचा उजवा गाल पूर्णतः फाटून छिन्नविछिन्न झाला आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली.
त्यानंतर बालकाला ब्रम्हपुरी शहरातील आस्था रुग्णालयात दाखल केले असता रुग्णालयातील डाॅक्टरांच्या चमूने त्या बालकावर प्लास्टिक सर्जरी करून १५० च्या जवळपास टाक्यांची तब्बल पाच तासांची यशस्वी शस्त्रक्रिया केली. चिमूर तालुक्यातील भिसी येथील रहिवासी असलेले विनोद डोंगरे हे आपल्या पत्नी व १० वर्षीय मुलासह मित्राच्या घरी असलेल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला गेले होते. तेव्हा सायंकाळी ६ वाजता वाढदिवसाचा कार्यक्रम सुरू झाला.
केकवर असलेली फवारे उडवणारी मेणबत्ती पेटविण्यात आली. मेणबत्तीवर फुंकर घालून विझविण्यातसुध्दा आली. केकसुध्दा कापून झाला. ही मेणबत्ती केकवरून काढून बाजूला फेकण्यात आली. तेव्हा कार्यक्रमात गेलेले विनोद डोंगरे यांचा १० वर्षीय मुलगा आरंभ याने ती मेणबत्ती आपल्या हातात पकडली असता तिचा स्फोट झाला. स्फोटाची भीषणता एवढी होती की, त्यामध्ये आरंभ याचा उजवा गाल पूर्णतः फाटून छिन्नविछिन्न झाला.
गालातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. त्याला ब्रम्हपुरी येथील आस्था रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्यानंतर लगेचच शुक्रवारी त्याच्यावर प्लास्टिक सर्जरी करून त्याचा फाटलेला गालाचा भाग आणि जीभ जोडण्यात आली. गालावर तब्बल १५० टाके मारण्यात आले. ही शस्त्रक्रिया प्लास्टिक सर्जन डॉ. श्रीकांत पेरका, डॉ. सुमित जयस्वाल, डॉ. पंकज लडके यांनी यशस्वीपणे पार पाडली.
संबंधित बालक गंभीर अवस्थेत होता, त्याची पूर्णत: जीभसुद्धा फाटली होती. उजवा डोळा २ ते ३ सेमीने वाचला, दोन ते तीन दिवस त्याला बोलता व काहीही खाता येत नव्हते. अशा बिकट परिस्थितीत आम्ही नागपूरवरून प्लास्टिक सर्जन डॉ. श्रीकांत पेरका यांना उपचारासाठी पाचारण केले. उपचारादरम्यान १५० टाके मारावे लागले.
डॉ. पंकज लडके,
आस्था हॉस्टपिटल, ब्रम्हपुरी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत