गोंडवाना विद्यापीठाची प्रथमच क्युआर कोड असलेली गुणपत्रिका #chandrapur #gadchiroli

Bhairav Diwase


चंद्रपूर/ गडचिरोली:- राज्यातील एकमेव आदिवासी भागातील गोंडवाना विद्यापीठाचे मागील 10 वर्षात लाखो विद्यार्थी शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. गोंडवाना विद्यापीठाचे प्रगतीचे आणखी एक पाऊल म्हणजे विद्यार्थ्यांच्या उन्हाळी 2022 परीक्षेच्या गुणपत्रिका क्युआर कोडमध्ये असणार आहे. विद्यार्थ्यांना कॅम्पस मुलाखत किंवा इतर काही मुलाखतीमध्ये गुणपत्रिकेची पडताळणी करावी लागते. जेणेकरून विद्यार्थी हा त्याच विद्यापीठात शिकला की नाही याची पुष्टी होते.

या प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना विद्यापीठात अर्ज भरणे, त्याला लागणारे शुल्क, विद्यापीठात वारंवार भेट देणे आदी बाबींसंदर्भात विद्यापीठाच्या स्तरावर कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्र. कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे डॉ. अनिल चिताडे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेण्यात आली. विद्यार्थ्यांचा मानसिक आणि आर्थिक त्रास लक्षात घेता एमकेसीएल पुणे यांच्या मदतीने उन्हाळी 2022 या परीक्षेपासून गुणपत्रिकेमध्ये क्युआर कोडची यंत्रणा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. क्युआर कोडमध्ये विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेमध्ये असलेली माहिती समाविष्ट करण्यात आलेली आहे. जेणेकरून कुठलीही थर्ड पार्टी एजेन्सी ही गुण पत्रिका आणि विद्यार्थी याची पडताळणी करू शकेल.

पडताळणीकरीता आता थर्ड पार्टी एजेन्सीला विद्यापीठात कुठलाही अर्ज करण्याची गरज नाही, त्यामुळे याचा फायदा विद्यार्थीवर्ग तथा संबंधितास होणार आहे. या यंत्रणेला पूर्णत्वास आणण्यासाठी विद्यापीठाचे कर्मचारी तथा असिस्टंट प्रोग्रामर प्रमोद बोरकर, परीक्षा विभागाचे सहाय्यक उपकुलसचिव दिनेश नरोटे, मनोज जाधव आणि एमकेसीएल यांच्या अथक प्रयत्नामुळे हे शक्य झाले आहे. त्या बद्दल एमकेसीएलच्या संचालिका वीणा कामत यांनी सर्व विद्यापीठातील अधिकारी आणि कर्मचारी यांचे आभार मानले आहे. ही यंत्रणा विद्यापीठाला भविष्यात अधिक प्रगती प्रथावर नेईल, अशी आशा सुद्धा व्यक्त केली.