Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

अमानुषतेचा कळस! #Chandrapur #ballarpur #dog

श्वानाच्या पायाला भला मोठा दगड बांधून नदीत फेकलं
चंद्रपूर:- माणुसकीला लाजवेल असे कृत्य बल्लारपूर तालुक्यातील दहेली या गावामध्ये घडले आहे. एका निष्पाप पाळीव श्वानाच्या पायाला भला मोठा दगड बांधण्यात आला. त्यानंतर तोंड ताराने बांधून नदीमध्ये फेकून देण्यात आले. विशेष म्हणजे यासंदर्भातील व्हिडिओही वायरल करण्यात आला. समाजमन सुन्न करणाऱ्या या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेमध्ये निष्पाप श्वानाचा मृत्यू झाला.
बल्लारपूर तालुक्यातील दहेली या गावामध्ये काही युवकांनी एका पाळीव श्वानाला अमानुषपणे ठार केले. तीन ते चार युवकांनी प्रथम श्वानाच्या पायाला दगड बांधला आणि मानेला फास आवळून त्याला नदीच्या पाण्यात मरण्यासाठी फेकून दिले. जिवाच्या आकांताने मोठ्या प्रयत्नाने तो नदीतून पोहून बाहेर आला. पाळीव असल्याने पुन्हा तो त्या युवकांजवळ आला. मात्र त्याला मारण्याचा पूर्णपणे विचार करून आलेल्या युवकांनी त्याचे पाय बांधून भलामोठा दगड बांधला. त्यानंतर तोंडाला ताराने बांधून पुन्हा नदीच्या पाण्यात फेकले. या वेळी मात्र तो पाण्यातून वर आलाच नाही. यासंदर्भातील व्हिडिओ सर्वत्र वायरल झाला. त्यानंतर येथील प्यार फाऊंडेशनच्या सदस्यांनी बल्लारपूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली आहे. अत्यंत निर्दयी कृत्य करणाऱ्यांवर कारवाईची मागणी आता केली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत