Top News

१५ तासानंतर पुरात अडकलेल्या शेतकऱ्यांना काढले सुखरूप बाहेर #chandrapur #chimur


चंद्रपूर:- शेतात रोवणीकरीता चिखल करण्यासाठी गेल्यानंतर पूरात अडकलेल्या पाच शेतक-यांना तब्बल १५ तासानंतर आज (दि.१८) दुपारी ३ च्या सुमारास बाहेर काढण्यात चंद्रपूरच्या रेस्क्यू पथकाला यश आले. पुरातून बाहेर काढणा-या शेतक-यांमध्ये दुर्गेश गायकवाड, गंगाधर चौधरी, योगेश्वर मेश्राम, गणेश रदये, दिलीप चौधरी यांचा समावेश आहे.
मागील २४ तासांत चिमूर तालुक्यात पडलेल्या मुसळधार पावसाने उमा नदीला प्रचंड महापूर आला आहे. अशातच काल रविवारी सायंकाळच्या सुमारास खातोडा (वडसी) येथील दुर्गेश गायकवाड, गंगाधर चौधरी, योगेश्वर मेश्राम, गणेश रदये, दिलीप चौधरी ट्रॅक्टर घेऊन रोवणी करण्याच्या उदेश्याने शेतात चिखल करण्यासाठी गेले होते. या सर्व शेतक-यांचे शेत जवळजवळ आहेत. चिखलटी सुरू असताना उमा नदीच्या पात्रात प्रचंड वाढ झाल्याने पाहता पाहता पूराचे पाणी शेतात वेगाने घुसले.
सर्व शेतांना तलावाचे स्वरूप प्राप्त झाले. लगेच सर्वांनी बाहेर निघण्याचा प्रयत्न केला असता, पाणी वाढल्याने बाहेर पडणे कठीण झाले. त्यामुळे काय करावे काय नाही सुचेनासे झाले. अखेर शेतातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली. त्यामुळे काही वेळ बांधावर आश्रय घेतला. पाणी पुन्हा वाढल्याने शेतकरी ट्रॅक्टरवर चढले. पाणी वाढत असल्याने जिवाच्या आकांताने काही शेतकरी झाडावर आश्रयीत झाले.
सदर घटनेची माहिती गावात कुटूंबियांना मिळाली. आणि शेतक-यांचे जीव वाचविण्यासाठी धडपड सुरू झाली. तालुक्याच्या महसूल प्रशासनाला माहिती देण्यात आली. त्यांनी चंद्रपूरला सदर घटनेची माहिती देवून बोटीची मागणी करण्यात आली.
चंद्रपूर येथून आलेल्या पथकातील राजु निंबाळकर, रामभाऊ शेवाळे, राहुल पाटील, ताराचंद कोटीलवार, टाकसाळे यांनी दुपारी दोनपासून रेस्क्यू सुरू केले. तब्बल तासभर रेस्क्यू करून त्यांना शेतातून सुखरूप बाहेर काढले. त्याचवेळी महसूल मंडळ अधिकारी तिडके, वडसीचे पोलीस पाटील दामोदर गेडाम, खातोडाचे पोलीस पाटील मोरेश्वर गायकवाड, अजय चांदेकर यांची उपस्थिती होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने