Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

दुर्गम भागातील युवकाची झेप #gadchiroli

गडचिरोलीकर हितेश होणार भारतीय हवाई दलात 'फ्लाईंग ऑफिसर'


गडचिरोली:- देशात मागास जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गडचिरोलीच्या मातीत जन्म घेतलेला हितेश सोनटक्के हा युवक आता भारतीय हवाई दलाच्या फायटर प्लेनमधून आकाशात उंच झेप घेणार आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या सीडीएस (कंबाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस) परीक्षेत देशातून चौथ्या क्रमांकाने तो उत्तीर्ण झाला आहे. हैदराबाद येथे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर तो हवाई दलात 'फ्लाईंग ऑफिसर' म्हणून रुजू होईल.
हितेशने बी.टेक. (सिव्हिल) ही पदवी घेतली आहे. शालेय जीवनापासूनच त्याच्यावर भारतीय वायुसेनेचा प्रभाव होता. बारावीनंतर तो 'एनडीए'ची परीक्षाही उत्तीर्ण झाला होता, पण मुलाखतीत त्याला अपयश आले. मात्र त्यामुळे खचून न जाता त्याने बी.टेक. पूर्ण केल्यानंतर 'सीडीएस'ची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण करत आपले ध्येय गाठले. भारतीय हवाई दलात अधिकारी म्हणून रुजू होणारा हितेश गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव आहे. त्यामुळे तो सर्वांसाठी प्रेरणास्थान ठरणार आहे. हितेश हा मालेर चक येथील प्रतिष्ठित व्यापारी, श्रीराम राईस मिलचे मालक जनार्धन कुकडे यांचा नातू (मुलीचा मुलगा) आहे.
छोट्याशा गावात जन्म, नागपूर-पुण्यात शिक्षण. मोर्शी तालुक्यातील मालेर चक (कुनघाडा रै.) या छोट्याशा गावी आपल्या मामाकडे जन्म झालेल्या हितेशचे गाव एटापल्ली आहे. त्या गावात त्याचे वडील मुरलीधर सोनटक्के यांचे मेडिकल स्टोअर आहे. गावात कॉन्व्हेंट नसल्याने त्यांनी हितेशला घोट येथील महात्मा गांधी कॉन्व्हेंटमध्ये टाकले. चौथ्या वर्गापर्यंत तिथे शिक्षण झाल्यानंतर दहावी-बारावीचे शिक्षण नागपूर येथे घेतले. दोन्ही परीक्षेत त्याला ९५ टक्के गुण होते. त्यानंतर पुणे येथील एमआयटी काॅलेजमधून सिव्हिल इंजिनीअरिंगची पदवी घेतली. यादरम्यान त्याने एनसीसीच्या एअर विंगमधून 'सी' सर्टिफिकेट परीक्षाही उत्तीर्ण केली. स्किट शूटिंगमध्ये तो देशभरातील कॅडेट्समध्ये पहिला आला होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत