चारगांव येथे वाघाच्या हल्ल्यात ३ गुरे ठार #Tiger #tigerattack #bhadrawati

Bhairav Diwase

गावकरी पुन्हा संकटात
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- येथून जवळच असलेल्या चारगांव येथील शेतशिवारात चरत असलेल्या ३ गुरांना पट्टेदार वाघाने ठार केल्याने गावकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
चारगांव येथील शेतमजूर लक्ष्मण मेश्राम यांची गाय व वासरू आणि नामदेव आत्राम यांचा बैल दि.२३ जुलै रोजी गावाजवळील शेतशिवारात चरत होते. दरम्यान, सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास पट्टेदार वाघाने या तिन्ही गुरांवर हल्ला करून ठार केले. त्यामुळे लक्ष्मण मेश्राम यांचे ५० हजारांचे आणि नामदेव आत्राम यांचे ४० हजारांचे नुकसान झाले आहे.
मेश्राम आणि आत्राम दोघेही मोलमजुरी करून आपल्या कुटुंबांचा उदरनिर्वाह करतात. तसेच ठेक्याने शेती करून जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करतात. यंदा आलेल्या महापुरामुळे शेतीचे पूर्णपणे नुकसान झाले. तर गावात पुराचे पाणी शिरल्याने घरे पडलीत आणि अन्नधान्याचे नुकसान झाले. रहायला घरे नसल्याने हे कुटुंब आता ग्रामपंचायतीच्या इमारतीत आश्रयाला आले आहेत. आधीच पुरामुळे संकटात सापडलेल्या मेश्राम यांचा दुधाचा व्यवसायही बंद पडला आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर मोठे आस्मानी संकट उभे ठाकले आहे.
या गावातील नागरिकांच्या घरांचे पंचनामे झाले आहेत. परंतु शेतीचे पंचनामे अद्याप झालेले नाही. त्यामुळे तात्काळ पंचनामे करून लवकरात लवकर आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी गावातील नागरिकांनी केली आहे. तसेच संपूर्ण गाव पुरात बुडाल्यामुळे अन्नधान्य व इतर वस्तू सडल्यामुळे दुर्गंधीची समस्या निर्माण झाली असून विविध आजारांची लागण होत आहे. त्यामुळे प्रशासनाने आरोग्य शिबीरे लावून गावकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी.अशीही मागणी होत आहे.
दरम्यान, पूर आल्यापासून जंगली श्वापदांनी गावाकडे येणे चालू केल्याने अनेक गावकऱ्यांना पट्टेदार वाघांचे दर्शन झाले आहे.एक वाघीण आणि दोन बछडे असे वाघाचे कुटुंब गावाजवळ फिरत असल्याने गावकऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे. आधीच पुराने त्रस्त झालेल्या गावकऱ्यांमध्ये पट्टेदार वाघांच्या दहशतीने आणखी भर घातली आहे.