Top News

कोची गावातील बालिकेला बोटीने काढावे लागले गावाबाहेर #bhadrawati #dance

प्रकृती बिघडल्याने न्यावे लागले रुग्णालयात
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:-  भद्रावती तालुक्यात पुराने थैमान घातले असून अनेक गावांना पुराने वेढा घातला असल्याने वैद्यकीय उपचार ‌घेणे सुद्धा कठीण झाले आहे. अमरावती जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक धरणांचे दरवाजे उघडावे लागले. त्यामुळे भद्रावती तालुक्यातील वर्धा नदी आणि इतर नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे. परिणामी, पिपरी, कोची, पळसगाव, माजरी, कोंढा, चारगांव ही गावे पुराच्या विळख्यात सापडली आहेत. 
     दरम्यान, आज दि.१० ऑगस्ट रोजी दुपारी कोची येथील निखिल आसमपल्लीवार यांच्या एक वर्षाच्या मुलीची प्रकृती बिघडल्याने आणि गावाच्या सभोवताल पाणी असल्याने मुलीला रुग्णालयात कसे न्यावे हा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे येथील तहसीलदारांना माहिती देण्यात आली. लगेच त्यांनी बचाव पथकाला पाचारण केले. त्या बचाव पथकाच्या मदतीने बोटीत बसून निखिल आसमपल्लीवार, मनिषा आसमपल्लीवार, निर्मला आसमपल्लीवार,  शांता वांढरे व नामदेव वांढरे यांना गावाबाहेर काढण्यात आले. त्यानंतर जवळच्या मुरसा येथे रुग्णालयात सदर मुलीला नेण्यात आले.
      दरम्यान, पळसगाव येथेही ग्रामस्थांच्या मदतीकरिता एन.डी.आर.एफ.च्या तीन बोटी दाखल झाल्या आहेत. तसेच माजरी येथे मुख्य मार्गावर पुराचे पाणी साचल्याने माजरी-कोंढा मार्गावरील बाभळीचे झाड मंगळवारी रात्री ११ वाजता  विद्युत तारेवर कोसळल्याने तीन विद्युत खांब कोलमडून पडले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु पोलिस स्टेशन, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि कोंढा परिसरातील वाहतूक ठप्प झाली होती. तसेच चारगांव एकता नगर वसाहतीकडून माजरीकडे जाणा-या मार्गावरील पुल खचल्याने हा मार्ग बंद करण्यात आला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने