चंद्रपूर:- खाजगी कॉन्व्हेंट शिक्षणाच्या माध्यमातून पालकांची मोठ्या प्रमाणात लूट होत असून, गणवेश आणि शालेय पुस्तकांसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक बोझा सहन करावा लागत आहे. त्यामुळे एक जिल्हा, एक गणवेश आणि एक राज्य; एक अभ्यासक्रम असावा अशी मागणी भद्रावती- वरोरा मतदारसंघाच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केली होती. त्यावर उत्तर देताना शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी हा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून, धोरणात्मक बदल करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले.
पालकांचा आर्थिक बोजा कमी करण्यासाठी शासनाने प्रत्येक ठिकाणी एकच अभ्यासक्रमाची पुस्तके कशी देता येईल, असे धोरण आखावे, त्यासोबत एक शाळा, एक गणवेश किंवा एक जिल्हा; एक गणवेश ही संकल्पना संपूर्ण राज्यात कशी राबवता येईल, यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी केली होती. याशिवाय अंशतः प्रलंबित असलेल्या विनाअनुदान शाळांना तातडीने अनुदान देण्याविषयी देखील मागणी केली होती. त्यावर शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी अशा शाळांना अनुदान मंजूर करण्यासाठी नुकतीच बैठक घेण्यात आल्याचे सांगून त्रुटी दूर करण्यासाठी प्रशासनाला सूचना देण्यात आल्याचेही यावेळी सांगितले.