Top News

१० हजार रुपयांची लाच स्वीकारताना दोघांना अटक #Two #arrested #bribe


(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) राहुल थोरात 
चंद्रपूर:- कृषी केंद्राचे विक्री परवाने अद्यावत करून देण्याच्या कामासाठी 10 हजार रुपये लाचेची मागणी करून स्वीकारणार्‍या चंद्रपूर येथील कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी सहायक जया विजय व्यवहारे यांच्यासह राजुरा येथील एका सत्यप्रत केंद्राचे मालक वैभव विजय धोटे यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी सापळा रचून अटक केली.
आपले सरकार या पोर्टल प्रणालीवर राजुरा तालुक्यातील पोवनी येथील तक्रारदारांच्या 4 जुन्या कृषी केंद्राचे विक्री परवाने नविनीकरण करणे, नविन परवाना काढून देणे व सर्व कृषी केंद्र परवाने स्थालांरित करुन देण्याचे काम करायचे होते. या कामाकरिता जया व्यवहारे यांनी 4 ऑगस्ट रोजी तक्रारदाराकडे 10 हजार रुपयांची मागणी केली होती. याबाबतची तक्रार तक्रारदारने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. तक्रारीवरून 5 ऑगस्टला सापळा रचण्यात आला.
कारवाईदरम्यान आरोपी जया व्यवहारे यांनी तक्रारदाराकडे 10 हजार रुपये लाचेची मागणी करून ती रक्कम गणपती कम्युनिकेशन आणि झेरॉक्स सेंटरचा मालक वैभव धोटे याच्या मार्फतीने स्वीकारली. तर, तक्रारदारकडून 10 हजार रुपये स्वीकारतान लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी वैभव धोटे याला रंगेहाथ पकडले. या प्रकरणी जया व्यवहारे यांना कृषी अधीक्षक, कृषी अधिकारी कार्यालय चंद्रपूर येथून ताब्यात घेण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नागपूरचे पोलिस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलिस अधीक्षक मधुकर गिते तसेच लाच लुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूरचे पोलीस उपअधीक्षक अविनाश भामरे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक शिल्पा भरडे, जितेंद्र गुरुनुले तसेच कार्यालयीन चमू पोलिस उपनिरीक्षक रमेश दुपारे, नरेशकुमार नन्नावरे, रोशन चांदेकर, रवीकुमार ढेंगळे, वैभव गाडगे, मेघा मोहुर्ले, पुष्पा काचोळे आदींनी पार पाडली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने