सुरजागडच्या समस्यांविरोधात गोंडपिपरीत रास्ता रोको

गोंडपिपरी;- सुरजागडच्या वाहतुकीमुळे गोंडपिपरी शहरात उद्भवणार्‍या समस्यांविरोधात शुक्रवारी सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास येथील गांधी चौकात आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात सर्वच राजकीय पक्ष, व्यापारी आणि सामाजिक संघटनांसह शहरातील नागरिक सहभागी झाले होते. भरधाव चालणार्‍या वाहतूकीवर वेळीच आवर घाला, अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा यावेळी उपस्थितांनी दिला.
सुरजागड लोहखनिज प्रकल्प सुरू झाल्याने चंद्रपूर-अहेरी राष्ट्रीय महामार्गावरून खनिज वाहतुकीसाठी गोंडपिपरीवरून दररोज शेकडो हायवा ट्रकची वाहतूक सुरू आहे. मात्र, वाहनचालकांचे वाहनावर कोणतेच नियंत्रण नसल्याने दिवसेंदिवस अपघातात वाढ होत आहे. सुरजागड लोकप्रकल्पाने परिसरातील हजारो लोकांचे कल्याण होईल, अशी अपेक्षा होती. पण आता हाच प्रकल्प नागरिकांच्या जिवावर बेतला आहे. अनियंत्रित वाहतूक, नशेखोर वाहनचालक आणि प्रशासनाचे होत असलेले दुर्लक्ष यासाठी कारणीभूत ठरत आहे. सुरजागड प्रकल्पाने गोंडपिपरी तालुक्यातील अनेक तरुणांच्या वाट्याला अपंगत्व आणलेय. अनेकांची घर फुटली.
मार्गावरील रहिवाशांना कमालीची भिती आहे. गोंडपिपरीवरून बायपास काढावा, नशेखोर वाहनचालकांची तपासणी करावी, वाहनचालकांचा परवाना तपासावा, 'ड्रिंक अँड ड्राईव्ह'च्या कारवाया कराव्या, नवेगाव (वाघाडे) टोल नाका लवकरात लवकर सुरू करावा, कंपनी मार्फत रस्त्यावर खाजगी सुरक्षा रक्षक देण्यात यावे, वर्दळीच्या ठिकाणी पोलिस बॅरिकेट्स लावावे, अवजड वाहतूक बंद करावी आदी मागण्यांच्या पूर्ततेसाठी येथील गांधी चौकात वाहतूक आंदोलकांनी एक तास अडवून धरली. त्यानंतर तहसीलदार के. डी. मेश्राम, ठाणेदार जीवन राजगुरू यांना निवेदन देण्यात आले. 15 दिवसात मागण्यां संदर्भात कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा शिवसेना, भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, व्यापारी संघटना, धर्मवीर प्रतिष्ठान, बौद्ध महासभा, जय मातादी क्रिडा मंडळ व नागरिकांतर्फे प्रशासनाला देण्यात आला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत