चंद्रपूर आगारात पुर्णवेळ आगार व्यवस्थापक द्या - शिवसेनेची मागणी #Bus #chandrapur

Bhairav Diwase

शिवसेनेच्या माजी जिल्हा संघठिका कुसुम उदार ह्यांचे विभागीय आगार प्रमुखांना निवेदन
चंद्रपूर:-
कुठल्याही कार्यालयात पूर्णवेळ अधिकारी असल्यास त्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ अधिक कार्यक्षमतेने कार्य करू शकते त्यामुळे अर्थातच उत्तम सेवा प्रदान करण्यास तसेच प्रत्येक कर्मचाऱ्यांकडून योग्य काम करवून घेण्यास मदत मिळते त्यामुळे अस्थाई किंवा प्रभारी अधिकारी देण्याऐवजी स्थाई अधिकारी नियुक्त करणे अत्यावश्यक असते. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महमंडळात मात्र कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्य मिरविणाऱ्या एस टी महामंडळाचा चंद्रपूर विभागातील जवळपास सर्वच आगाराचा कारभार रामभरोसे असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात चार आगार असुन सर्व ठिकाणी स्थाई आगार व्यवस्थापक नसल्याने प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. जिल्हा मुख्यालय असलेल्या चंद्रपूर येथे बस स्थानकावर आगार असुन इथेही पूर्णवेळ आगार व्यस्थापक नाही. सध्या चंद्रपूर बसस्थानकाचे नूतनीकरण सुरू असून बसस्थानक अनेक समस्यांना ग्रस्त आहे. जवळपास तब्बल 5 महिने एस टी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता त्यावेळी प्रवाशांना अनेक त्रास सहन करावे लागले तरीही नागरिकांनी कुठलाही प्रतिकार किंवा विरोध केला नाही मात्र त्यानंतर अचानक महामंडळाने जिल्ह्यातील चारही आगार व्यवस्थापकांची बदली केली. त्यांच्या जागी नविन व्यवस्थापकांनी पदभार घ्यायला हवा होता मात्र जिल्ह्यात केवळ दोन अधिकारी रुजू झाले. त्यातील एका अधिकाऱ्याने कर्तव्य पार पडण्याऐवजी सुटीवर जाणे पसंत केले तर दुसऱ्या अधिकाऱ्यांना बढती मिळाल्याने ते विभागीय आगारात रुजू झाल्याने ते आगारही बेवारस झाले आहे.
बस स्थानक चंद्रपूर येथे अस्थायी डेपो व्यवस्थापक असल्यामुळे येथील कार्यरत कर्मचाऱ्यांची प्रशासनिक कार्ये होण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. करिता बस स्थानक चंद्रपूर मध्ये पूर्णवेळ आगार व्यवस्थापक देण्याची मागणी शिवसेनेच्या माजी जिल्हा संघठिका कुसुम उदार यांनी निवेदनातून केली आहे.
सद्यस्थितीत बस स्थानक चंद्रपूर येथे प्रभारी डेपो व्यवस्थापक सकळी १० वाजेपर्यंत काम पाहतात आणि दुसरीकडे कार्यालयात जातात. त्यामुळे दिवसभर बसस्थानकाला व चंद्रपूर आगाराला कुणीही वाली नाही. बस स्थानक येथे प्रभारी आगार व्यवस्थापक असल्यामुळे कर्मचाऱ्यांची प्रशासनिक कार्ये प्रलंबित होत आहे त्यामुळे चंद्रपूर आगाराला पूर्णकालीन आगार व्यवस्थापक देण्याची मागणी कुसुम उदार यांनी केली आहे.